भारनियमनामुळे संतप्त शेतकऱ्यांची वीज उपकेंद्रात तोडफोड; दीडशे शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 06:11 PM2022-04-14T18:11:25+5:302022-04-14T18:15:05+5:30
गत आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
भंडारा : भारनियमनामुळे सिंचनात बाधा येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण उपकेंद्रावर हल्लाबोल करीत तोडफोड केल्याची घटना पवनी तालुक्यातील आसगाव येथे बुधवारी घडली. याप्रकरणी तीन गावांतील सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध पवनी ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आसगाव वीज उपकेंद्राला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
गत आठ दिवसांपासून कृषी फिडरवर मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. दररोज कुठे ना कुठे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकत आहेत. बुधवारी पवनी तालुक्यातील ब्रह्मी, बाचेवाडी या गावातील सुमारे १०० ते १५० शेतकरी आसगाव वीज उपकेंद्रावर धडकले. प्रवेशद्वार बंद असताना शेतकऱ्यांनी उड्या मारून आत प्रवेश केला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत खिडक्या, दरवाजे, खुर्च्यांची तोडफोड केली. या प्रकाराने उपस्थित कर्मचारी घाबरून गेले.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ उपस्थित होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे सतीश दुर्योधन कोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुमारे दीडशे शेतकऱ्यांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, १४३, ५०४, ५०६ यासह शासकीय मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
वीज कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
शेतकऱ्यांचा जमाव वीज वितरण कंपनीवर पोहोचला तेव्हा कंत्राटी यंत्रचालक सतीश कोरे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते धक्काबुक्की करीत कार्यालयात शिरले. तेथे असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ चित्रा कैलाश सोनकुसरे यांना शिवीगाळ केली, तर सहायक तंत्रज्ञ रमाकांत खंडारे यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकाराने कर्मचारी प्रचंड घाबरून गेले होते.
शेतकऱ्यांनी बळजबरीने सुरू केला वीज पुरवठा
वीज वितरण उपकेंद्रात धडकलेल्या शेतकऱ्यांनी बळजबरीने वीज पुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ११ केव्ही आसगाव, ढोलसर, खैरी कृषी फिडरवर वीज पुरवठा सुरू करून वाहिनी बंद केली, तर आम्ही पुन्हा येऊ आणि तोडफोड करू, अशी धमकी दिली.
राज्यात सर्वत्र विजेची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी संयम पाळून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे. तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करू नये.
- राजेश नाईक, अधीक्षक अभियंता, वीज वितरण कंपनी, भंडारा