जिल्हा क्रीडा संकुलाला दुरवस्थेची साडेसाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:06 PM2018-08-28T22:06:34+5:302018-08-28T22:06:55+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचे नामोल्लेख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिल्हा क्रीडा संकुलाची सध्या अवस्था दयनीय झाली आहे. विविध समस्यांची साडेसाती संपण्याचे नाव घेत नसून विकासाच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचे रुपडे केव्हा पालटणार असा सवाल क्रीडाप्रेमी करीत आहेत. बुधवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असताना येथील जिल्हा क्रीडा संकुलांची समस्या कायम आहे.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे नामोल्लेख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिल्हा क्रीडा संकुलाची सध्या अवस्था दयनीय झाली आहे. विविध समस्यांची साडेसाती संपण्याचे नाव घेत नसून विकासाच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचे रुपडे केव्हा पालटणार असा सवाल क्रीडाप्रेमी करीत आहेत. बुधवारी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असताना येथील जिल्हा क्रीडा संकुलांची समस्या कायम आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही. प्रत्येक तालुका पातळीवर तालुका क्रीडा संकुल असले तरी त्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. अनेक तालुक्यात क्रीडा संकुलांची इमारत असली तरी ती शोभेची वास्तू ठरली आहे. खेळाडूंसाठी गुणवत्ता व दर्जात्मक साधने उपलब्ध नसल्याने खेळाडूंचा हिरमोड होत असतो. मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर, पवनी व लाखनी येथील क्रीडा संकुल परिसर विस्तीर्ण असला तरी अनेक सुविधांचा वाणवा कायम आहे.
भंडारा शहरात बसस्थानक परिसराला लागून असलेल्या विस्तीर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे. या संकुलात खेळण्याचे मैदान, धावपट्टी, बास्केटबॉल, बॅडमिंटन यासह शालेय क्रीडास्पर्धा घेण्यांतर्गत मैदान उपलब्ध आहे. मात्र या क्रीडा संकुलात सुविधांचा अभाव आहे. धावपट्टी फक्त पाहण्यासारखी असून पावसाळ्यात याची देखरेख योग्यरित्या होत नाही. मुख्य मैदानात मोठ्या प्रमाणात गवत व पाणी साचले असून त्याचीही देखभाल करण्यात येत नाही. नाल्यांवरील जाळी तुटलेली असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून येथे दिसत आहे. मात्र शासकीय पातळीवर कोणतीच उपाययोजना होत नसल्याने क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी आहे.
क्रीडाप्रेमींची निराशा
जिल्हा क्रीडा संकुलाला वैभव प्राप्त करून द्यावे असा मानस आजपर्यंत अनेक क्रीडा प्रेमींनी व्यक्त केला. मात्र निधीअभावी ते स्वप्न आजपावेतो पूर्ण झालेले नाही. क्रीडा क्षेत्रातील होत असलेला भ्रष्टाचार, कामे दाखवून लाटलेला निधी ही खरी बोंब क्रीडा संकुलाच्या विकासात आडकाठी ठरली आहे. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने संकुलाच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविला असला तरी तो मंजूर झालेला नाही, अशी प्राथमिक माहिती आहे. या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.