सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:11+5:30

सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना प्रकल्प स्थळात साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पाला सुरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे. जाळीला लोखंडी रॉडने आधार देण्यात आलेला आहे. चोरट्यांनी लोखंडी रॉड कापून नेले आहेत. 

Safety of Sondyatola Upsa Irrigation Project | सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा करण्यासाठी गार्ड नियुक्त करण्यात आले असले तरी सेवेला दांडी मारण्यात येत असल्याने साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पाचे सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी जाळीचे रॉड चोरट्यांनी लंपास केले आहेत. यामुळे प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. 
महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प या ना त्या कारणाने चर्चेत आहे. बावणथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सिहोरा परिसरातील सोंड्याटोला सिंचन प्रकल्प सुरक्षा गार्डच्या अफलातून कारभाराने पुन्हा चर्चेत आला आहे. ११० कोटी खर्चाच्या प्रकल्पाची सुरक्षा करण्यासाठी प्रकल्प स्थळात नऊ सुरक्षा गार्डची पदे वाढविण्यात आली आहेत. या वर्षात यात दोन पदे कपात करण्यात आली आहेत. एकूण सात पदे भरण्यात आली आहेत. तुमसरच्या कंत्राटदाराला पदे भरतीचे कंत्राट देण्यात आले आहे. 
सोंड्याटोला प्रकल्पात सहा आणि चांदपूर जलाशयात एक, अशी सुरक्षा गार्डची पदे भरण्यात आली आहेत. प्रकल्प आणि साहित्य सुरक्षेची जबाबदारी या सुरक्षा गार्डच्या खांद्यावर देण्यात आली आहे; परंतु प्रकल्प स्थळात भलतेच प्रकार सुरू आहेत. सुरक्षा गार्ड तैनात असताना प्रकल्प स्थळात साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रकल्पाला सुरक्षित करण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण करण्यात आले आहे. जाळीला लोखंडी रॉडने आधार देण्यात आलेला आहे. चोरट्यांनी लोखंडी रॉड कापून नेले आहेत. 
सुरक्षा गार्डच्या डोळ्यादेखत प्रकल्प स्थळात चोरीचा प्रकार घडत असताना सुरक्षा गार्ड शांत बसले आहेत. प्रकल्प स्थळातील धरण मार्गावरून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यातील नागरिकांची वर्दळ सुरू राहत आहे. प्रकल्प स्थळात चोऱ्या होत असताना पोलिसांत मात्र तक्रार देण्याचे टाळण्यात येत आहे. निविदा कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे सोंड्याटोला प्रकल्पात आलबेल प्रकार सुरू आहे.  याकडे संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने शंकाकुशंकांना पेव फुटले आहे. वरीष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सुपरवायझरचे पद समाप्त 
- सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात सुरक्षा गार्ड नियुक्त करताना एक पद सुपरवायझरसाठी अनेक वर्षांपासून राखीव करण्यात आले आहे; परंतु यंदा सुरक्षा गार्डची सात पदे भरताना सुपरवायझरचे पद समाप्त करण्यात आले आहे. सुरक्षा गार्डच्या सेवेवर नियंत्रण ठेवणे, सेवेला दांडी मारणाऱ्या गार्डची हकालपट्टी करणे, त्यांची हजेरी घेणे, प्रकल्पात नियमित भेट देणे, सुरक्षा गार्डच्या कामावर लक्ष ठेवणे, अशी अनेक कामे सुपरवायझरची आहेत; परंतु सुपरवायझरचे पद रद्द करण्यात आल्याने नियंत्रण सुटले आहे.

Web Title: Safety of Sondyatola Upsa Irrigation Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.