शाळांमध्ये 'सखी सावित्री' करणार विद्यार्थ्यांची सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:18 AM2024-09-21T11:18:20+5:302024-09-21T11:19:08+5:30
Bhandara : मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी समितीचे गठन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी सर्व शाळास्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १२९७ शाळांमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. यातील काही शाळांमध्ये ही समिती नावापुरतीच असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासन निर्णयांची शाळामध्ये अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
शाळांत विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील तर ही समिती त्याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही करणार. त्यामुळे विद्यार्थी निर्भयपणे शाळेत मुक्त वावरू शकतील. मात्र अनेक शाळांमध्ये सखी सावित्री समिती ही केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे. समिती स्थापन झाल्यावर प्रत्यक्ष कार्य सुरू होणे आवश्यक आहे.
बालकांचा मूलभूत हक्क
सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळविण्याचा अधिकार आहे. जसे जीविताचा अधिकार, शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार, बालविकासावर परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा मिळविण्याचा बालकांना हक्क आहे
जिल्ह्यात १ हजार २९७ शाळा
जिल्हा परिषदेच्या १ हजार २९७ शाळा असून, त्यापैकी सर्वच शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन केली. • या समिती स्थापनमध्ये माध्यमिक, नगरपरिषद शाळांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार समितीचे कार्य सर्व शाळेला समजावून सांगण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
सखी सावित्री' समितीची कार्ये
- शाळाबाहेर मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे.
- मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देणे. मुला-मुलींना करिअरसंबंधी मार्गदर्शन करणे. मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
- मुला-मुलीसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे. • बालविवाह रोखून, पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे
- सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला- मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.
- शाळेत समतामूलक वातावरणासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे.
सखी सावित्री समिती रचना
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष, महिला शिक्षक सदस्य, समुपदेशक-सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला) सदस्य, अंगणवाडी रोविका सदस्य, पोलिस पाटील सदस्य, ग्रामपंचायत सदस्य (महिला) - सदस्य, पालक (महिला)-सदस्य, विद्यार्थी (२ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी) सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सदस्य सचिव असतात.