सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:31+5:302021-07-25T04:29:31+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीमध्ये एजन्सी ...
चुल्हाड ( सिहोरा ) : बावणथडी नदीवरील सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीमध्ये एजन्सी धारकाने मनमानी कारभार करीत कपात केले आहे. यामुळे कार्यरत सुरक्षा रक्षकांना १२ तास सेवा बजावण्याची वेळ आली आहे. या प्रकल्पात नऊपैकी केवळ चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. शासनाचा अनुदान लाटण्याचा प्रकार एजन्सी धारकांने केला असून निविदा रद्द करण्याची मागणी होत आहे.
सिहोरा परिसरात बावणथडी नदीवर ११० कोटी रुपये खर्च करून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प तयार करण्यात आला आहे. प्रकल्पातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. मध्यप्रदेश राज्याचे दुसऱ्या टोकावर असणाऱ्या या प्रकल्पात कोट्यवधी किंमतीचे साहीत्य असल्याने सुरक्षा करण्यासाठी स्वतंत्र पद्धतीने निविदा काढण्यात येत आहेत. वार्षिक पद्धतीने निविदा मंजूर करण्यात येत आहेत. परंतु कधीही एजन्सी धारक नियम व अटींचे पालन करतांना दिसून येत नाहीत. नियमाचे अनुषंगाने नऊ पदे सुरक्षा रक्षकाचे आहेत. सुरक्षा रक्षकांना फक्त आठ तास सेवा बजावण्याचे अटी व शर्तीत नमूद करण्यात आले आहे. त्यांना ड्रेस, ओळखपत्र आदी देण्याचे करारबद्ध करण्यात येत असताना नियम, अटी व शर्तींना एजन्सी धारकांचे करवी पायदळी तुडविण्यात येत आहे. या वर्षीचे टेंडर कुरेशी नामक एजन्सी धारकांना मंजूर करण्यात आले आहे. एजन्सी धारकाने सुरक्षा रक्षक नियुक्ती करतांना आलबेल प्रकार सुरू केला आहे. प्रकल्प स्थळात फक्त चार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. दिवस असताना दोन आणि रात्री दोन अशा सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकाना १२ तास सेवा बजवावे लागत आहे. कार्यरत सुरक्षा रक्षकाना ड्रेस व ओळखपत्र देण्यात आले नाहीत. नियम आठ तासाचे असताना १२ तास सेवा घेतली जात आहे. पंपगृह सुरू करण्यासाठी हल्ला व श्रेय घेण्यासाठी चढाओढ करणारे नेते बंद असणारे पंपगृह सुरू व दुरुस्ती करीता ब्र काढत नाहीत. मात्र प्रकल्प सुरू केल्याचे घेण्यासाठी उदोउदो करीत आहेत. सोंड्याटोला प्रकल्पाने पाण्याचा उपसा सुरू केला आहे.
बॉक्स
स्थिरीकरण योजनेचे काय ?
बावणथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नाही. उन्हाळ्यात सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाण्याचा उपसा करीत नाहीत. वैनगंगा नदीच्या पात्रात बारमाही पाणी राहत असल्याने माजी आमदार चरण वाघमारे यांनी बपेरा चांदपूर स्थिरीकरण योजना मंजुरीचा प्रस्ताव सादर केला आहे. ही योजना चांदपूर जलाशयाला बारमाही तारणारी असून शासनाने या योजनेला मंजुरी दिल्यास रोटेशन पद्धतीला पूर्णविराम मिळणार आहे. या दिशेने भरीव प्रयत्न झाले पाहिजे. यामुळे १२ हजार हेक्टर आर शेती बारमाही ओलिताखाली येणार असून योजनेला मंजुरी देण्याची मागणी युवा नेते किशोर रांहगडाले, ग्रामपंचायत सदस्य शितल चिंचखेडे, सरपंच वैशाली पटले, सरपंच ममता राऊत यांनी केली आहे.