साहेब दवाखान्यात जातोय, भाजी, दूध, मेडिकलमधून औषधे आणायला चाललोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:35 AM2021-04-17T04:35:27+5:302021-04-17T04:35:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे भंडारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे भंडारा शहरासह जिल्हाभरात व्यापारी प्रतिष्ठाने तसेच सर्वच छोटी-मोठी दुकाने, बाजारपेठा, शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. मात्र, अशातही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. त्यामुळे अशांवर वचक ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कारवाई केेली. विविध कारणांमुळे शनिवार, रविवार या दोन दिवसात ४९४ वाहनधारकांवर कारवाई करत तब्बल १ लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. त्यामुळे आता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना अंकुश बसणार आहे. जिल्ह्यात कोरोना मृतांचे प्रमाण वाढले असल्याने प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, भंडारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार लोकेश काणसे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी शासकीय निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. यामध्ये अनेकजण तर दूध आणायला जातोय, भाजी आणायला जातोय, औषध आणायला जातोय, साहेब माझे नातेवाईक दवाखान्यात आहेत, त्यांना डबा द्यायचा आहे अशी विविध कारणे सांगत पोलिसांना विनवणी करत होते. तर अनेकजण विनाकारण घराबाहेर फिरतानाही दिसून येत होते. पोलिसांनी अशांना पोलिसी खाक्या दाखवत घरची वाट दाखवली. अनेक तरुण खोटी कारणे सांगून रस्त्यावरून फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच, अशांना समज देत नियमांचे पालन करण्यास भाग पाडले. अनेकांमध्ये भीती निर्माण झाली असून, लॉकडाऊन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करून विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बॉक्स
कोणत्याही रस्त्यावरून गेलात तरी पोलिसांची करडी नजर
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे भंडारा शहरात ठिकठिकाणी प्रमुख चौकांंतर्गत भागातही पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे भंडारा शहरात शुक्रवारी दिवसभर काही जणांवर कारवाई केली गेली. रविवारी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४९४ जणांवर कारवाई करुन यात एक लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या ३१ जणांवर १५ हजार ५०० रुपयांचा दंड तर सीटबेल्टशिवाय वाहन चालविणाऱ्या ७० जणांना १४ हजार रुपयांचा दंड, इन्शुरन्स नसलेल्या एकाला दोन हजार रुपयांचा दंड तर ट्रिपल सीट जाणाऱ्या २७ जणांवर पाच हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याचबरोबर धोकादायक पद्धतीने वाहने चालवत अपघाताला आमंत्रण देणाऱ्या ७ जणांना ७ हजार रुपयांचा दंड, वन-वेने फिरणाऱ्या ५ दुचाकीस्वारांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाईतून पोलिसांनी एकूण १ लाख २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बॉक्स
बाहेर फिरणाऱ्यांची कारणे मात्र सारखीच
अजी साहेब, दवाखान्यात चाललो आहे. मेडिकलमधून माझ्या गोळ्या आणायच्या आहेत, भाजी आणायची आहे, अशीच कारणे सांगून अनेकजण पोलिसांना विनवणी करत होते. अनेक चौकात दूध आणायला जातोय, औषधे आणायची राहिली आहेत, घरी भाजीपाला नाही, माझा नातेवाईक दवाखान्यात भरती आहे, अशी कारणे सांगून अनेकजण रस्त्यावरून जाताना पोलिसांनी पकडताच हात जोडून विनवणी करुन सांगत होते. यावेळी काहींची पोलिसांनी खातरजमा करूनच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.