साकोलीकरांना मिळणार दोन वेळा पाणी
By admin | Published: June 1, 2016 01:52 AM2016-06-01T01:52:51+5:302016-06-01T01:52:51+5:30
शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी दोनवेळेस पुरवठा करावे, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज भारद्वाज यांनी केली होती.
भारद्वाज यांच्या प्रयत्नांना यश : जिल्हाधिकाऱ्यांचे नगरपंचायतीला पत्र
साकोली : शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी दोनवेळेस पुरवठा करावे, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज भारद्वाज यांनी केली होती. याची दखल प्रशासनाने घेवून आता दोन वेळेस पाण्याचा पुरवठा करण्याचे पत्र दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत साकोली - सेंदूरवाफाला नळाद्वारे पुरवठा करण्यात येणारे पाणी चार ते पाच वर्षापासून बंद करण्यात आले आहे. जवळील कुंभली येथील चुलबंद नदीच्या पात्रातून पुरवठा होणाऱ्या नदी पात्रात मानवी अंत्यसंस्कार होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्याने पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे याचा फटका साकोलीकरांना बसला. सध्या तलाव वॉर्डातील गोबाडे टोली येथे पाच हॉर्सपावर पंप अस्तित्वात असून नळाद्वारे केवळ तलाव वॉर्ड, गणेश वॉर्ड व टोलीवॉर्डात पाणी पुरवठा तुरळक प्रमाणात होत आहे. २.१५ लाख लिटरची मर्यादा असलेल्या पाणी टाकीतून नागरिकांना पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य हेमराज भारद्वाज यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाला असून भारद्वाज आहे.
दरम्यान साकोली ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने ग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेने नगरपंचायतकडे हस्तांतरीत केली. तथापि, नगरपंचायतची निवडणूक न झाल्याने हे प्रकरण नगरपंचायतकडे हस्तांतरीत होवू शकत नाही. शहराला पुरवठा होत असलेले पाणी अपुरे असल्याने व कमी अश्वशक्तीचे मोटारपंप व त्यावरील दुरुस्ती खर्च ३० हजार असून नवीन पंप खरेदी करणे अपेक्षित आहे. हा खर्च १.१५ लाख असून नगरपंचायतकडे पाणी पुरवठ्याबाबत आवश्यक निधी व तांत्रिक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने १ लक्ष ५० हजार रकमेचा खर्च नगरपंचायतीला स्वत:च्या निधीतून करावा लागेल असे पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायत साकोली प्रशासक ला २४ मे रोजी पाठविले आहे.
काही का असो, माजी ग्रामपंचायत सदस्य सदस्य हेमराज भारद्वाज यांनी प्रशासनाकडे वारंवार पाण्याचा मुद्दा रेटून धरल्याने तो मार्गी काढण्यात आला आहे. साकोलीत आता सकाळी मिळणारे पाणी सकाळ - सायंकाळ दोन वेळा उपलब्ध होणार आहे. (शहर प्रतिनिधी)