सखी मतदान केंद्रानी वाढविला महिलांचा सन्मान महिलांनी घेतली सेल्फी : इतरांना मतदानासाठी पाठविले संदेश

By युवराज गोमास | Published: April 19, 2024 05:28 PM2024-04-19T17:28:51+5:302024-04-19T17:31:56+5:30

Lok Sabha Election 2024: भंडारा -गोंदिया लोकसभा मतदार संघात महिलांसाठी ११ सखी मतदान केंद्राची विशेष सुविधा, महिलांचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न

Sakhi polling stations developed in Bhandara for women voters to boost women's respect | सखी मतदान केंद्रानी वाढविला महिलांचा सन्मान महिलांनी घेतली सेल्फी : इतरांना मतदानासाठी पाठविले संदेश

Bhandara polling booth

भंडारा : जिल्ह्यात भंडारा -गोंदिया लोकसभा मतदार संघात ११ महिला मतदान केंद्राची विशेष सुविधा पुरविण्यात आली. महिलांचा सन्मान वाढविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. या मतदान केंद्रांचे सर्व प्रकारचे संचालन व व्यवस्थापन महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांभाळले. मतदान केंद्र सजविण्यात आले होते. आकर्षक कमानी उभारून महिलांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी आनंदाने मतदान करीत मतदानाची निशाणी दाखविणारी सेल्फी घेत इतर महिलांना मतदानाचे संदेश पाठविले.


तुमसर विधानसभा मतदार संघात बोथली, वरठी, खैरलांजी, मेहगाव आदी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. भंडारा विधानसभा मतदार संघात जि. प. शाळा वाही, ग्रामपंचायत कार्यालय खोकरला, सेंट पॉल स्कूल भंडारा येथे तर साकोली विधानसभा मतदार संघात विकास हायस्कूल पवनी, जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूर, समर्थ महाविद्यालय मुरमाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोली येथील केंद्रांचा सखी मतदान केंद्रात समावेश होता.


खोकरला येथील मतदान केंद्रावर राष्ट्रीय महोत्सव, 'मी करणार मतदान, सुस्वागतम्', अशी वाक्य लिहलेल्या गेटस् उभारण्यात आल्या होत्या. महिलांसाठी बैठक व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी आनंदाने मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करताना दिसून आल्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारण्यात आली होती. त्यावर आम्ही भंडारावासी १०० टक्के मतदान करू, असे वाक्य ठळकपणे लिहले गेले होते. सेल्फी काउंटर फुग्यांनी सजविण्यात आले होते. त्याचखाली 'ओ भाऊ मी मतदान करणार, तुम्ही पण मतदान करा', असे आवाहन करण्यात आले होते. मतदानावेळी असुविधा होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जात होती.


वृद्ध व दिव्यांगांना मदतीचा हात
वृद्ध व दिव्यांगासाठी व्हिलचेअरची सुविधा देत मदतीचा हात पुढे केला जात होता. पोलिस कर्मचाऱ्यांचा व अन्य अधिकारी, कर्मचारी तैनातीला होते. वृद्ध, अपंगांनी मतदान केल्यानंतर आनंद व्यक्त केला. मतदार भारविल्याचे चित्र पहावयास मिळाले.


नववधूसारखे सजले मतदान केंद्र
सेंट पॉल स्कूल येथील सखी मतदान केंद्र आकर्षक फुग्यांच्या कमानीने सजविण्यात आले होते. हिरवी मॅट अंधारली गेली होती. नववधूसारखे केंद्र सजविण्यात आले होते. महिला मतदारांनी सुविधांचा लाभ घेत भरभरून मतदान केले. सेल्फी पाईंटवर मतदानाचे फोटो काढून इतरांना मतदानासाठी सोशल माध्यमावरून पाठविले. एकंदर सखी मतदान केंद्रावर उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.


महिलांनी सांभाळल्या विविध जबाबदाऱ्या
भंडारा जिल्ह्यात महिलांसाठी ११ विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या मतदान केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होती. मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंतचे संपूर्ण कामकाज महिलांनी सांभाळले. दिवसभर येथील मतदान केेंद्राचे वातावरण उत्साहपूर्ण होता.

Web Title: Sakhi polling stations developed in Bhandara for women voters to boost women's respect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.