साकोली, लाखनी, तुमसरात एस.टी.चा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:04 PM2018-06-01T23:04:57+5:302018-06-01T23:05:12+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन साकोली, लाखनी, तुमसर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन साकोली, लाखनी, तुमसर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
साकोली : जनतेच्या सेवेत अविरत राहून प्रवाशांना उच्चतम प्रवाशाच्या सोयी उपलब्ध करून एस.टी. ने आजही आपले स्थान कायम ठेवले आहे. यासाठी महामंडळातर्फे प्रवाशासाठी वेगवेगळ्या योजना काढण्यात येऊन याचा फायदा थेट प्रवाशांना देण्यात येतो. त्यामुळे एस.टी. सेवा एक उत्तम सेवा असून कोट्यवधी प्रवाशी आज समाधानी आहेत, असे मत आगार व्यवस्थापक सचिन नेवारे यांनी साकोली बसस्थानकात एस.टी. च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी बसस्थानकातील प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच आजपासून शिवशाही बसमध्ये जेष्ठ नागरिकांना ४५ टक्के तर स्लीपर कोच बसमध्ये ३० टक्के सवलत लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वळसकर, वाहतूक निरीक्षक विजय नंदागवळी, निरीक्षक सुभाष हटवार, पृथ्वीराज चव्हाण, वाहतूक नियंत्रक अशोक देशमुख, लिपीक नरेश नगररक तर प्रवाशी रूपाली साठवणे, समृद्धी साळवे, संस्कार साठवणे, अनिल चांदेवार, शिक्षक चांदेवार, समीर चांदेवार उपस्थित होते.
लाखनी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. चा वर्धापन दिन येथील मुख्य बसस्थानकात साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा ज्योती निखाडे यांचे अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, प्रा. अशोक गायधनी, गोपालकृष्ण गिºहेपुंजे, वाहतूक निरीक्षक भास्कर डहाके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सोलसे यांनी सुरक्षिततेसाठी एस.टी.नेच प्रवास करावा. खाजगी वाहनांनी प्रवास करू नये. एस.टी. द्वारा प्रवाशांसाठी असलेल्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. प्रा. अशोक गायधनी, ज्योती निखाडे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमोद फाये, अशोक वैद्य, तरोणे, चोले, राजू निखाडे, इटवले आदीसह प्रवासी उपस्थित होते. संचालन दिलीप भैसारे यांनी केले. अशोक वैद्य यांनी आभार मानले.
तुमसर : धावपळीच्या जिवनात प्रवास सुखाचा व्हावा, सुरक्षित व्हावा याकरिता प्रवासी एस.टी. बसलाच प्राधान्य देतात. कमी पैशात हमखास सेवा म्हणून सामान्य जनतेची प्रथम पसंत ठरली आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास ठरला असल्याचे प्रतिपादन राहुल डोंगरे यांनी केले.
रापम तुमसर आगाराच्या वर्धापन दिन आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख युधिष्ठीर रामचवरे होते. प्रमुख अतिथी व पालक अधिकारी म्हणून शैलेश भारती, विभागीय अधिकारी, रचना मस्करे, एस.एल. लांजेवार, विरेंद्र गभने उपस्थित होते. यावेळी बसस्थानकावर सडा घालून, रांगोळी काढण्यात आली. फुलांचे तोरण, आंब्याचे पान व केळीचे खांब स्वागतस्थानी उभारण्यात आले. प्रवाशांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. संचालन विरेंद्र गभणे यांनी तर आभार ज्ञानेश्वर घाटोळे यांनी मानले.