साकोली, लाखनी, पवनीत शासकीय वसतिगृह मंजूर
By Admin | Published: September 10, 2015 12:29 AM2015-09-10T00:29:30+5:302015-09-10T00:29:30+5:30
समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह साकोली लाखनी व पवनी येथे मंजूर झाले आहे.
साकोलीत जागा निश्चित
साकोली : समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह साकोली लाखनी व पवनी येथे मंजूर झाले आहे. लवकरच या वसतीगृहाच्या कामाला सुरुवात होणार असून यासाठी शासनतर्फे १८ कोटी ५० लक्ष ५६ हजार ७३३ रूपयाचा निधी मंजुर झाला आहे. हा निधी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांना प्राप्त झाला आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडीच्या कामासाठी तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधीला आ. बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने अंतिम मंजुरी मिळाली, हे विशेष.
मागासवर्गीय समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यासाठी समाज कल्याण विभागातर्फे वसतीगृहाला मंजुरी देण्यात आली असून यात साकोली येथे मुलीसाठी, लाखनी येथे मुलासाठी व पवनी येथे मुलीसाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले असून प्रत्येकी वसतिगृहासाठी ६ कोटी १६ लक्ष ८५ हजार ५९१ रूपये याप्रमाणे एकूण १८ कोटी ५० लक्ष ५६ हजार ७३३ रूपये मंजुर होवून शासनातर्फे हा निधी सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांचेकडे प्राप्तही झाला आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणी बांधकामाला लवकरच सुरवात होणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)