साकोली आघाडीवर; गोंदिया पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:10 PM2018-05-29T22:10:04+5:302018-05-29T22:10:20+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पोटनिवडणुकीत ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची अंतिम टक्केवारी ५३.१५ ईतकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पोटनिवडणुकीत ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची अंतिम टक्केवारी ५३.१५ ईतकी आहे.
या पोटनिवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रात ६०.३३ टक्के सर्वाधिक तर गोंदिया विधानसभा क्षेत्रात ४४.८७ टक्के सर्वात कमी मतदान झाले. आता सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे ती ३१ मे च्या मतमोजणी दिवसाची. गुरूवारला दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ५७ हजार ८५४ मतदार असून यामध्ये ८ लाख ८२ हजार १७५ पुरूष तर ८ लाख ७५ हजार ६७९ महिला मतदार आहे. यापैकी ४ लाख ७७ हजार ३७० पुरूष तर ४ लाख ५६ हजार ८५९ महिला असे एकूण ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदान केले.
तुमसर विधानसभा क्षेत्रात १ लाख ६७,०९० (५७.३८ टक्के), भंडारा विधानसभा क्षेत्रात १ लाख ६५,१३३ (४५.९० टक्के), साकोली विधानसभा क्षेत्रात १ लाख ८६,३११ (६०.३३ टक्के), अर्जुनी विधानसभा क्षेत्रात १ लाख ४२,४०७ (५७.९४ टक्के), तिरोडा विधानसभा क्षेत्रात १ लाख ३५,४७९ (५५.२७ टक्के), गोंदिया विधानसभा क्षेत्रात १ लाख ३७,८०९ (४४.८७ टक्के) मतदान झाले.
यापैकी साकोली क्षेत्रात ६०.३३ टक्के इतके सर्वाधिक तर गोंदिया क्षेत्रात ४४.८७ टक्के कमी मतदान झाले. या पोटनिवडणुकीत महिलांपेक्षा पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी अधिक होती. पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी ५४.११ इतकी तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५२.१७ ईतकी आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ३१ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मतमोजणी होणार असून ईव्हीएम ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवण्यात आले आहे. या परिसरात शस्त्रधारी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून मुख्य मार्गावर पोलिसांसाठी राहुटी तयार करण्यात आली आहे. या ‘स्ट्राँग रूम’ समोरचा मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
४९ मतदान केंद्रांवर होणार आज फेरमतदान
सोमवारला पार पडलेल्या या पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे ४९ मतदान केंद्रांवर मतदान झाले नव्हते. त्यामुळे या ४९ केंद्रावर (दि.३० मे) बुधवारला फेरमतदान होणार आहे. यात भंडारा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र अडयाळ (३०२), नवेगाव (३२०), उमरी (३१८), पिंपळगाव (३३५), पवनी (४०३), पवनी (४०५), खैरी दिवाण (३७४), पिलांद्री (३१४), केसलवाडा (३१७), पाथरी पुर्नवसन (३२२), लोणारा (३६२), लोणारा (३६३), वलनी (४२८), वलनी (४२९) अशा १४ केंद्रांवर, साकोली विधानसभा क्षेत्रातील पारडी (३०६), मुरमाडी (३१६), तईबुज (२९२), घोडेझरी (२८७) अशा चार केंद्रांचा समावेश आहे.