लिलाव न होता ऐतिहासिक वास्तूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:47 PM2018-06-14T23:47:41+5:302018-06-14T23:47:41+5:30

अनेकांनी आपले प्राण धोक्यात घातले. घामाच्या धारा सांडवत इमला उभा केला. श्रमातून उभी असलेली वास्तू बघून अभिमानच वाटायचा. जीर्ण इमारत ठरवून ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली. कान्हळगाव/ सिरसोली येथे श्रमातून तयार केलेली गुरुदेव सेवा मंडळाच्या त्या वास्तूमधील साहित्याची विक्री करण्यात आली.

Sale of a historical place without auction | लिलाव न होता ऐतिहासिक वास्तूची विक्री

लिलाव न होता ऐतिहासिक वास्तूची विक्री

Next
ठळक मुद्देश्रमदानाच्या घामाची किंमत शून्य! : पैशाचा अपहार, चौकशीला दिरंगाई, जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : अनेकांनी आपले प्राण धोक्यात घातले. घामाच्या धारा सांडवत इमला उभा केला. श्रमातून उभी असलेली वास्तू बघून अभिमानच वाटायचा. जीर्ण इमारत ठरवून ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली. कान्हळगाव/ सिरसोली येथे श्रमातून तयार केलेली गुरुदेव सेवा मंडळाच्या त्या वास्तूमधील साहित्याची विक्री करण्यात आली. श्रमप्रतिष्ठेचा अवमान किंबहूना अनेकांच्या श्रमदानाच्या मेहनतीची किंमतच शून्य करुन टाकली आहे.
कान्हळगाव/ सिरसोली येथील गुरुदेव सेवा मंडळाची इमारतीला पाडून तेथील साहित्याची लिलाव न करता परस्पर विक्री करुन पैशाचा अपहार करण्यात आला, असा आरोप विभागिय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी मोहाडी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला. मे रोजी उपसरपंच राजु उपरकर, ग्रा. पं. सदस्य सतिश ईटनकर, शुभांगी बोबडे, रक्षा बागडे व अर्चना ठवकर यांनी तक्रार केली होती. तथापि या तक्रारीची अधिकाऱ्यांनी साधी दखल घेतली नाही.
आदर्श मंडळ, कान्हळगाव यांच्या ताब्यातील गुरुदेव सेवा मंडळाची इमारत काही आदर्श मंडळाच्या पदाधिकाºयांनी नियमबाह्यपणे ग्रामपंचायतीला हस्तांतरीत केली. ग्रामपंचायतने नमुना आठ वर सदर इमारत स्वत:च्या मालकीची केली. हत्तीखाना या नावाने परिचीत अशी गुरुदेव सेवा मंडळाची वास्तू उभी करण्यासाठी अनेकांनी कष्ट केले.
गावाशेजारील गायमुख टेकडीच्या पायथ्यापासून येणाºया पाण्याद्वारे मोठी लाकडे वाहून यायचे, लाकडांना पकडण्यासाठी अथांग पुरात जिगरबाज स्वर्गीय शेगो शेंडे, स्वर्गीय कवळू बोबडे, स्वर्गीय नारायण शेंडे, बाबूराव नागमोथे, तुकाराम बांते, बापू नागमोथे, माधवराव बांते, नरेश ठवकर, बाळू बोबडे, मोहन वहिले, बाबूराव ईटनकर, दिलीप ठवकर आदी जण उडी घेवून ती लाकडे (मयाली) पकडायचे. जीव धोक्यात घालून दरवर्षी लाकडे जमा करण्याचा जणू छंदच त्या जिगरबाजांनी जोपासला होता. लाकूड पकडण्याच्या साहसात टेकचंद कुकडकर या तरुणाचा त्यावेळी जीव बचावला.
प्राणाची बाजी लावून त्या इमारतीसाठी मयाली तयार करण्यात आल्या होत्या. गावात सुतारकाम करणारे नागपूरे व गडरिये बंधूनी आपले श्रम मयाली तयार करण्यासाठी खर्च केले होते. या श्रमाचा एक रुपयाही त्यांनी घेतला नाही. तसेच गवंडी काम करणारे स्वर्गीय कवळू बोबडे व त्यांच्या मुलांनी तसेच इतरांच्या श्रमदानातून विटामातीची पक्की इमारत चाळीसवर्षापूर्वी उभी केली होती. खारीचा वाटा उचलणाºया अनेकांच्या श्रमदानातून उभी असलेल्या इमारतीकडे बघून अभिमान वाटायचा. पण काही, स्वार्थी लोकांनी जीर्ण इमारत झाल्याचे सांगून ती इमारत ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली.
बांधकाम विभागाची परवानगी घेवूनच इमारत पाडण्यात आली असे सांगितले जाते. ती इमारत पाडल्यानंतर विटा, कवेलू, दरवाजे, खिडक्या, सागवानाच्या मयाली, सागवान फाटे आदी साहित्यांची किंमत अंदाजे दोन लक्ष रुपये होती. इमारतीचे साहित्य कोणते आहेत याची नोंद मालमत्ता रजिस्टरला घेण्यात आली नाही. साहित्याची मासिक सभेत किंमत ठरविण्यात आली नाही. लिलावाची कायदेशीर पध्दत वापरली गेली नाही. लिलावासाठी जाहिरनामा काढण्यात आला नाही. वर्तमानपत्रात जुनी मालमत्ता विकण्याची निविदा देण्यात आली नाही. लिलाव कधी होणार याबाबत उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना कल्पना देण्यात आली नाही. साहित्याची बोली किती रुपयाने करायची हे ठरविण्यात आले नाही. तथापी, कोणताही प्रकारचा लिलाव न करता परस्पर दोन लक्ष रुपयांत विक्री करण्यात आली. साहित्य खरेदी करणारा मालक कोण याचा कुणालाच पत्ता नाही. ग्रामपंचायतकडून साहित्य कोणाच्या मालकीचा आहे याचा आदेश बनवला गेला नाही. या प्रकरणाची तक्रार होणार याची कुणकुण लागताच साधारणत: अडीच महिण्याचे साहित्य खरेदीचे पाच हजार रुपये बँकेत जमा करण्यात आले. त्याच दिवशी नमूना ७ ची पावती फाडण्यात आली. म्हणजे कुणीतरी परस्पर साहित्याची विक्री करुन रुपये आपल्याकडेच ठेवून घेतल्याचे स्पष्ट होते हे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
१ मे २०१८ रोजी ग्रामपंचायत कान्हळगावची मासिक सभा झाली. सभेत इमारत साहित्याचा विषय काढण्यात आला. सरपंचानी स्वत:च्या मर्जीने साहित्य विक्री करुन पैसा खर्च केला असा ठराव सभेत पारित करण्यात आला. या प्रकरणाची तक्रार करुन तीन आठवडे होऊनही साधी चौकशी करण्यात आली नाही. तक्रार संबंधित दस्ताऐवज गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांनी तात्काळ ताब्यात घ्यावे व चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.

Web Title: Sale of a historical place without auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.