गोंदियात देशी कट्ट्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:21 AM2021-03-29T04:21:39+5:302021-03-29T04:21:39+5:30
गोंदिया : गोंदियात संघटित गुन्हेगारी सक्रिय आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आरोपींवर मोक्का लावतात. तरी देखील काही टोळ्या ...
गोंदिया : गोंदियात संघटित गुन्हेगारी सक्रिय आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आरोपींवर मोक्का लावतात. तरी देखील काही टोळ्या टप्याटप्याने जन्म घेत आहेत. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरणारे लोक आहेत. आपसी वैमनस्यातून एकमेकांचा काटा काढण्यासाठी किंवा एकमेकाला धमकाविण्यासाठी या देशी कट्ट्यांचा सर्रास वापर केला जात आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगड येथून गोंदिया येणाऱ्या या देशी कट्ट्यांच्या गोरखधंद्याला पायबंद घालण्याची गरज आहे.
गोंदिया शहराला काही बड्या लोकांनी मिनी मुंबई म्हणून संबाेधले आहे. या मिनी मुंबई असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरले जात आहेत. एखादा गुन्हा घडला तर त्या देशी कट्ट्यांचा विषय पुढे येतो अन्यथा या देशी कट्ट्यांकडे दुर्लक्ष हाेत आहे. परवाना घेतल्याशिवाय बंदूक वापरता येत नाही. परंतु गोंदिया विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरले जात आहेत. रेती माफियांचा वाद झाला किंवा गॅंगवार झाला यावेळी देशी कट्यांचा वापर होताना दिसत आहे. गोंदिया शहरात दिवसाढवळ्या देशी कट्ट्यांची विक्री होत आहे. याचा प्रत्यय स्वत: गोंदियाच्या पोलिसांना आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून देशी कट्टा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रंगेहात पकडले होते. एखाद्याचे प्रेम प्रकरण असो किंवा वैनमस्य यात टोकाची भूमिका घेतलेल्या लोकांनी एकमेकांना संपविण्यासाठी देशी कट्ट्यांचा वापर केल्याच्या घटना गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत. या विना परवाना देशी कट्टा वापरणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ज्यांच्याकडून देशी कट्टे जप्त केले त्यांच्याकडून सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून पुरवठा
देशी कट्टा गोंदियात मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यातून होतो. बिहार आणि उत्तर प्रदेशातूनही देशी कट्टा गोंदियात येत असल्याची माहिती आहे. हे देशी कट्टे २० हजारांपासून तर लाखो रुपये किमतीला विक्री होत असल्याची माहिती आहे. या देशी कट्ट्यांच्या विक्रीला लगाम लावण्याची गरज आहे.