भंडारा डेपोमधून १० हजार ब्रास रेतीची विक्री, ऑनलाईन विक्रीला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 10:43 AM2023-06-07T10:43:43+5:302023-06-07T10:45:37+5:30
सर्वाधिक साठा भंडारा जिल्ह्यात
नागपूर : अनधिकृत रेती उत्खननाला चाप लावण्यासाठी तसेच नागरिकांना बांधकाम योग्य रेती स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन वाळू (रेती) धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ४७३ ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापैकी १० हजार १६५ ब्रास रेतीची विक्री झाली आहे.
वर्धा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, हिंगोली आदी केंद्रांवर रेती विक्रीला सुरुवात झाली आहे. यास नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी होत आहे.
नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील जनतेला आवश्यक असलेल्या रेतीसाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणीची सुविधा आहे. यानुसार ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध होणार असून वाहतुकीची सशुल्क सुविधा असल्याने घरपोच वाळू मिळत आहे.
राज्यात सर्वाधिक ऑनलाईन विक्री अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे. येथे १२ हजार ६३३ ब्रास रेती नागरिकांना सहजपणे उपलब्ध झाली आहे. भंडारा जिल्ह्यात १० हजार १६५ ब्रास, वर्धा जिल्ह्यात १ हजार २४६ ब्रास, नाशिक जिल्ह्यात ११६.५ ब्रास, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७८ ब्रास, हिंगोली जिल्ह्यात १२.५ ब्रास तर लातूर जिल्ह्यात १ ब्रास वाळुची विक्री झाली आहे. राज्यात सर्वाधिक साठा भंडारा जिल्ह्यातील वाळू (रेती) केंद्रावर १६ हजार ४७३ ब्रास उपलब्ध आहे. नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने १४ हजार ५१८ ब्रास रेतीसाठी मागणी नोंदविली आहे. भंडारा जिल्ह्यात ४ ठिकाणी प्रमुख साठा केंद्र (डेपो) असून त्यापैकी तीन केंद्रे सुरू झाली आहेत. नागपूर जिल्ह्यातही रेती साठवणुकीचे ११ केंद्रे उभारण्यात आली आहेत. येथे ८ हजार ८८१ ब्रास रेती विक्रीसाठी उपलब्ध आहे.