भंडाऱ्यात खासदारांसाठी रात्री दहा वाजता उघडले सलून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:09 PM2020-08-08T19:09:00+5:302020-08-08T19:11:39+5:30
खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी बैठक घेवून या जनता कफ्यूर्साठी नागरिकांना आवाहन केले होते. मात्र त्यांनीच नियम मोडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसगार्चा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात घोषित जनता कर्फ्युच्या आदल्या रात्री दहा वाजता खासदार तथा नगराध्यक्षांसाठी सलून उघडून त्यांची दाढी-कटिंग केल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने सदर सलून व्यवसायिकाला पाच हजार रुपए दंड ठोठाविला आहे. जनता कर्फ्यूची घोषणा करणाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भंडारा शहरात अलिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपरिषदेच्या पुढाकाराने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी बैठक घेवून या जनता कफ्यूर्साठी नागरिकांना आवाहन केले होते. मात्र त्यांनीच नियम मोडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जनता कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री १० वाजता ते येथील जिल्हा परिषद मार्गावरील साई मंदिर परिसरातील एका सलूनमध्ये दाढी-कटिंग करीत असल्याचा तो व्हीडीओ आहे. शनिवारी सकाळपासून हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून खासदार तथा नगराध्यक्ष नियम मोडत असेल तर काय, असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात आहे.
दरम्यान या प्रकरणाची माहिती नगरपरिषदेतील कोविड नियंत्रण कक्षाला कुणीतरी दूरध्वनीवरून दिली. त्यावरून तात्काळ नगरपरिषदेचे पथक या सलूनमध्ये पोहचले. त्याठिकाणी पंचनामा करून कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच सदर सलून व्यवसायिकाला पाच हजार रूपयाचा दंडही ठोठावला. दरम्यान याप्रकरणी पोलीसात तक्रार दिली काय, याबाबत ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी आपणाकडे अर्ज आला होता परंतु अशा प्रकरणात कारवाईचे अधिकार नगरपरिषदेला असल्याने त्यांना तेथे जाण्यास सांगण्यात आल्याचे बन्सोडे म्हणाले.
कोरोना रुग्ण आढळल्याने आम्ही राहतो तो परिसर कंटेन्मेंट झोन घोषित झाला आहे. तसेच दोन दिवस शहरात जनता कर्फ्यू असल्याने रात्री नागपूरला जात होते. रस्त्यावर सलून उघडे दिसल्याने वॉशरूमसाठी तेथे गेलो. त्यावेळी त्याला एवढ्या रात्री दुकान उघडे कसे असे विचारले तेव्हा एसीची दुरूस्ती करीत असल्याचे दुकानदाराने सांगितले. आपण त्याला चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश करून दे असे म्हटले. त्याचवेळी कुणीतरी व्हीडीओ तयार केला असावा. हा प्रकार मला बदनाम करण्याचा आहे.
सुनील मेंढे, खासदार तथा नगराध्यक्ष भंडारा.
व्हायरल व्हिडीओची माहिती आम्हाला मिळाली. तसेच नगरपरिषदेच्या कोविड नियंत्रण कक्षातही दुरध्वनीवरून सूचना दिली. त्यावरून आमचे पथक त्या ठिकाणी पोहचले. दुकानदाराला पाच हजार रुपए दंड केला. पुन्हा हाच प्रकार घडल्यास दुकान कायमचे बंद करण्याची ताकिद दिली. शहरात नियमाचा भंग करणाºया कुणाचीही गय केली जाणार नाही. लवकरच शहरात रात्र गस्तीसाठी एक पथक तयार करण्यात येणार आहे.
विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद भंडारा.