वृक्षारोपणासाठी महिलांनी दिला ‘समता’ संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 12:35 AM2016-06-29T00:35:07+5:302016-06-29T00:35:07+5:30
डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर ....
वृक्ष लागवडीतून पर्यावरण जतन : दुर्लक्षित बालोद्यानाचा होणार कायापालट
भंडारा : डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर पुरूष प्रधान संस्कृतीने लादली होती. ती मोडीत काढीत महिलांनी त्यांच्या कर्तत्वाने परिस्थितीत बदल घडवून आणला आहे. महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने व त्यांच्या कार्यकतृत्वाने महिलांनी पर्यावरण जतनासाठी घेतलेला पुढाकार समाजासमोर खरोखरचं आदर्शवत आहे.
भंडारा शहरातील समता नगर वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी पर्यावरणासाठी पुढाकार घेतलेला आहे. या वसाहतीत ले-आऊट मालकाने नागरिकांसाठी मोकड्या जागेवर बालोद्यान व मंदिरची उभारणी केली. सुरूवातीचे काही दिवस बालोद्यानात जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, कालांतराने हे बालोद्याने दुर्लक्षीत झाल्याने, त्या झाडे-झुडपे वाढली. त्यामुळे बालोद्यानाचा कायापालट करण्यासाठी नागरिकांच्या पुढाकाराची गरज असताना त्यासाठी कोणीही वज्रमुठ बांधली नाही.
पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्यासाठी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संदेश घराघरात पोहचविला आहे. शासनाच्या हाकेला समता नगरातील महिलांनी साद दिली.
येथील महिलांनी एकत्र येवून त्यांच्या वसाहतीतील एकमेव बालोद्यानातील कचरा काढून स्वच्छता अभियान राबविले आहे. सोमवारपासून येथील सुमारे ५० च्या वसाहतवासीय बालोद्यानातील कचरा काढण्यासाठी श्रमदान करीत आहेत. यात महिलांचा मोठा सहभाग आहे. पहिल्या दिवशी त्यांनी पुरूषांच्या मदतीने झुडपे तोडली. तर आज दुसऱ्या दिवशीही दिवसभर येथे श्रमदान करण्यात आले. बालोद्यानाचा पूर्णपणे कायापालट करून येथे ५० च्यावर विविध प्रजातींचे वृक्षारोपन करण्याचा संकल्प या महिलांनी घेतला आहे. महिलांच्या पुढाकारामुळे बालोद्यान कात टाकणार आहे. येथील बंद झालेला बालकांचा किलबिलाट पुन्हा एकदा येत्या काही दिवसात ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी घेतलेला पुढाकार खरोखरचं वाखान्याजोगा व आदर्शवत आहे. (शहर प्रतिनिधी)
या महिला, पुरूषांनी घेतला पुढाकार
मेघा नारायणपुरे, कलावती कुंभारे, मंगला तितिरमारे, लता मोथरकर, प्रतिभा चांदेकर, माला भोगे, मंगला जगताप, कविता तिघरे, बेला ठकरेले, कविता गायधने, ज्योती नागरिकर, मीनाक्षी बालपांडे, रिंकू ठोंबरे, पे्रमनाथ चांदेकर, अरूण सेलोकर, देवीदास भारद्वाज, मनोज बोरकर, वैशाली झाडे, निक्कू कुंभारे, अक्षय फडके आदींनी पुढाकार घेतला.