पवनी उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:34+5:302021-05-20T04:38:34+5:30
पवनी तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने ५० खाटांवरून १०० खाटांचे हे उपजिल्हा रुग्णालय करून घेण्यात आमदार ...
पवनी तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने ५० खाटांवरून १०० खाटांचे हे उपजिल्हा रुग्णालय करून घेण्यात आमदार भोंडेकर यांना यश आले आहे. राज्यातील एकूण २३ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० खाटांसाठी १४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पवनी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाकरीता ९२ कोटी ६० लक्ष रुपये निधी लागणार असून अंदाजपत्रक व आराखडे विहीत नमुन्यात शासनाकडे पाठविण्यात आले आहे. या अंदाजपत्रकास हायपावर कमिटीने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्तावाला मंत्रिमंडळाने सुद्धा मंजुरी दिल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.
पवनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामासोबतच भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोगासाठी रेडिओ थेरपी युनिट व साथरोगाची अद्ययावत रुग्णालय यासाठीसुद्धा शासनाने मंजुरी दिली आहे. पवनी येथील उपजिल्हा रुग्णालय, अड्याळला ग्रामीण रुग्णालय, भंडारा येथील महिला रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अद्ययावत व्हावेत, यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर सतत पाठपुरावा करत आहेत. पवनी उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था मंजूर करून दिल्याबद्दल आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.