लख्ख चंद्रप्रकाशात निसर्गानुभवासाठी अभयारण्य सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:46+5:30
निसर्गानुभवात वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत वन्यप्राणी व निसर्गप्रेमी १६ मे राेजी रात्री सहभागी हाेत आहेत. नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत निसर्गानुभव-२०२२ या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची प्रगणना करणे हे यामागील उद्देश आहे. बुद्ध पाैर्णिमेच्या रात्री अर्थात १६ मे राेजी हा निसर्ग अनुभवण्याचा उपक्रम आयाेजित केला आहे. चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग व वन्यजीवांचे दर्शन जवळून घडणार आहे.
युवराज गाेमासे
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाैर्णिमेच्या रात्री लख्ख चंद्रप्रकाशात निसर्गानुभवासाठी काेका वन्यजीव अभयारण्य सज्ज झाले आहे. वन्य प्राण्यांची प्रगणना करण्यासाठी चार सहवनक्षेत्रात १७ मचाणी उभारल्या असून १७ कर्मचारी आणि ३४ प्रगणकांच्या माध्यमातून प्राण्यांची नाेंद घेतली जाणार आहे. या निसर्गानुभवात वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाेबत वन्यप्राणी व निसर्गप्रेमी १६ मे राेजी रात्री सहभागी हाेत आहेत.
नवेगाव-नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत निसर्गानुभव-२०२२ या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची प्रगणना करणे हे यामागील उद्देश आहे. बुद्ध पाैर्णिमेच्या रात्री अर्थात १६ मे राेजी हा निसर्ग अनुभवण्याचा उपक्रम आयाेजित केला आहे. चंद्राच्या लख्ख प्रकाशात निसर्ग व वन्यजीवांचे दर्शन जवळून घडणार आहे.
काेका वन्यजीव अभयारण्यात डाेडमाझरी, चंद्रपूर, उसगाव, काेका हे चार सहवनक्षेत्र आहे. या सहवनक्षेत्रात १७ मचानी तयार करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करून ३४ प्रगणकांची नियुक्त करण्यात आली आहे, तर १७ कर्मचारी त्यांच्या मदतीला राहणार आहेत. भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले काेका वन्यजीव अभयारण्य निसर्गप्रेमींना भुरळ घालत असते.
असे आहे काेका वन्यजीव अभयारण्य
- भंडारा तालुक्यात ११० चाैरस किमी क्षेत्रात काेका वन्यजीव अभयारण्य आहे. १८ जुलै २०१३ रोजी या अभयारण्याची निर्मिती झाली. अभयारण्यात २०० प्रजातींचे पक्षी, ५० प्रजातींची फुलपाखरे, हजाराे वृक्ष आहेत. यासाेबतच वाघ, बिबट, चांदी अस्वल, रानकुत्रे, काळी अस्वल, चितळ, रानगवे, सांभाळ, रानकाेंबडे, साळिंदर आदी प्राणी आहेत. बेहडा, हिरडा, बेल, रक्तपापळी, अमरवेल अशा वनऔषधी वृक्षांची भरमार आहे. घनदाट जंगल डाेंगरमाळा आणि खळखळणारे निर्झर पर्यटकांना भुरळ घालतात.
व्याघ्र दर्शनाने पर्यटकांत वाढ
- काेका वन्यजीव अभयारण्यात २९ एप्रिल राेजी एका तलावाच्या तिरावर तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन झाले. वन्यप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली. त्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढत गेला. सुमारे ५०० पर्यटकांनी व्याघ्र दर्शनानंतर सफारीचा आनंद लुटला. वन्यजीव विभागाच्या वतीने पर्यटनासाठी विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.
नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ६७ मचान
साकोली : नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्गानुभव उपक्रमासाठी जुना नागझिरा २८, नवीन पिटेझरी २८, नवीन उमरझरी ११ असे ६७ मचान उभारले आहे. १६३ निसर्गप्रेमी या अभियानात सहभागी होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सफारी पासून वंचित असलेल्या निसर्गप्रेमींना या अभियानामुळे सफारीचा आनंद घेता येणार आहे. नागझिरा अभयारण्य प्रशासनाच्यावतीने या निसर्गानुभव उपक्रमाचे आयाेजन केले असून यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.