दोन वाघांच्या मृत्यूने अभयारण्य हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:32 PM2018-12-31T22:32:55+5:302018-12-31T22:33:10+5:30

डौलदार शरीरयष्टीच्या प्रसिद्ध जय वाघाच्या वास्तव्याने उमरेड- पवनी-कऱ्हांडला अभयारण्याची ख्याती देश-विदेशात पोहोचली होती. पर्यटकांचा ओघ वाढला होता. मात्र एकापाठोपाठ एक वाघ बेपत्ता आणि मृत्युमुखी पडलेत. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोन वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अभयारण्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. पर्यटकातही असंतोष दिसत आहे.

The sanctuary shakes the death of two tigers | दोन वाघांच्या मृत्यूने अभयारण्य हादरले

दोन वाघांच्या मृत्यूने अभयारण्य हादरले

Next
ठळक मुद्देपर्यटकात असंतोष : चार्जर पाठोपाठ राहीचा मृतदेह आढळला

अशोक पारधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : डौलदार शरीरयष्टीच्या प्रसिद्ध जय वाघाच्या वास्तव्याने उमरेड- पवनी-कऱ्हांडला अभयारण्याची ख्याती देश-विदेशात पोहोचली होती. पर्यटकांचा ओघ वाढला होता. मात्र एकापाठोपाठ एक वाघ बेपत्ता आणि मृत्युमुखी पडलेत. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोन वाघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अभयारण्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. पर्यटकातही असंतोष दिसत आहे.
पवनी तालुक्यात उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना २०१२-१३ मध्ये करण्यात आली. वन्य जीवांचा या अभयारण्यात मुक्त संचार असतो. त्यातच या अभयारण्यात वाघांचे वास्तव्य आहे. अनेक पर्यटकांना व्याघ्रदर्शनाची संधी मिळाली. त्यामुळे शेकडो पर्यटक पवनी गेटमधून या अभयारण्यात प्रवेश करतात. जंगल सफारीतून निसर्गासोबतच वन्यजीव निरीक्षणाचा आनंद लुटतात.
या अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आशिया खंडात प्रसिद्ध असलेला जय वाघ होता. डौलदार शरीर यष्टीमुळे तो बघता क्षणीच नजरेत भरायचा. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य म्हणजे जय वाघ अशी ओळख झाली होती. सुरूवातीला त्याची चांदी ही जोडीदार होती. त्यानंतर राहीसोबत त्याची जोडी जमली. त्यांच्यापासून सात बछडे या अभयारण्यात जन्मास आले. वाघाची डरकाडी आसमंत भेदून टाकायची. मात्र या अभयारण्याला कुणाची तरी नजर लागली.
रूबाबदार जय वाघ जुलै २०१६ पासून बेपत्ता आहे. त्यानंतर त्याचा बछडा जयचंदही बेपत्ता झाला. वन्यजीव विभागाला अद्यापही या दोन वाघांचा थांगपत्ता लागला नाही. अशातच शनिवार २९ डिसेंबर रोजी जयचा बछडा चार्जरचा मृतदेह चिचगांव कंपार्टमेंटमध्ये आढळून आला. यावृत्ताची शाही वाळत नाही तोच सोमवारी राही वाघीनीचा मृतदेह त्याच परिसरात आढळून आला. विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पाठोपाठ दोन वाघांचा मृत्यू झाल्याने अभयारण्यातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वाघांचे वास्तव्य असलेल्या अभयारण्यात सुरक्षेत अनेक तृट्या दिसून येतात. या अभयारण्यात हव्या तेवढ्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात वन्यजीव विभाग कमी पडल्याचे बोलले जात आहे.
राही वाघिणीचा मृत्यू चार्जर वाघापूर्वी
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात राही वाघीणीचा मृत्यू २९ डिसेंबर रोजी तर चार्जर वाघाचा मृत्यू ३० डिसेंबर रोजी झाल्याचे पुढे आले आहे. रानडुकर मारण्यासाठी विषाचा प्रयोग करण्यात आला असावा आणि त्या रानडुकराची शिकार वाघीणीने केली असावी. त्यानंतर नर वाघाने मांस खाल्याने या दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला. मृतावस्थेत आढळलेल्या दोन्ही वाघांचे नखे, मिशा साबूत होत्या. घटनास्थळावर क्षेत्र संचालक रवी गोवेकर, विभागीय वनअधिकारी राहूल गवई लक्ष ठेवून आहे. राही वाघीणीचे शवविच्छेदन डॉ. बी. एम. कडू, डॉ. व्ही. बी. हटवार, डॉ. चेतन पातोंडे, डॉ. बी.एम. राठोड यांनी सायंकाळी केले. यावेळी मुख्य वनसंरक्षकाचे प्रतिनिधी संजय करकरे व एनटीसीएचे प्रतिनिधी रोहीत कारु उपस्थित होते. सायंकाळी या वाघीनीवर जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभयारण्यात लोकवस्ती व शेती
उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात लोकवस्ती आणि शेती आहे. अभयारण्य परिसरात जाण्यासाठी प्रमुख मार्ग खापरी रस्ता आहे. परंतु कोरंथी (ठाणा) चिचखेडा, पाहुणगाव हे मार्ग अभयारण्यातून अनधिकृतपणे प्रवेशासाठी खुले आहे. खापरी रेहपाडे परिसरात गायडोंगरी व परसोडी हे गावठाणा आहे. अभयारण्यालगत ग्रामस्थांची शेती आहे. पाहुणगाव परिसरात चिचखेड, निमगाव हे गावठाण असून त्या गावातील शेती अभयारण्यालगत आहे. काही गावे अभयारण्यापासून जवळ आहे. अभयारण्यालगतच्या शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पिकांवर किटकनाशक फवारणी करतात. अनेकदा तृणभक्षी प्राणी या पिकावर ताव मारतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू होता आणि या मृत्यू झालेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्यामुळे वन्यजीवांना धोका निर्माण होतो. अशाच प्रकारात हे दोन वाघ मृत्युमुखी पडले तर नाही ना याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The sanctuary shakes the death of two tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.