दोन वर्षांपासून अभयारण्य पर्यटन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:29+5:302021-07-01T04:24:29+5:30

भंडारा : निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अभयारण्य पर्यटनावर अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो. कोरोना संकटाने गत दोन ...

Sanctuary tourism stalled for two years | दोन वर्षांपासून अभयारण्य पर्यटन ठप्प

दोन वर्षांपासून अभयारण्य पर्यटन ठप्प

Next

भंडारा : निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अभयारण्य पर्यटनावर अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालतो. कोरोना संकटाने गत दोन वर्षांपासून अभयारण्य पर्यटन ठप्प पडले आहेत. परिणामी गाईड्स, जिप्सी चालक आणि मालक बेरोजगार झाले आहेत. जंगल परिसरात पर्यायी व्यवसाय नसल्याने अनेकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका अभयारण्य आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आहेत. दरवर्षी शेकडो पर्यटक एप्रिल ते जून या कालावधीसाठी पर्यटनासाठी येतात. त्यामुळे येथे असलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालक, मालकांना रोजगार उपलब्ध होतो. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या भंडारा जिल्ह्यातील तीन गेटवर ५० जिप्सी आणि १०७ गाईड आहेत. तसेच कोका आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला येथेही गाईड आणि जिप्सी आहेत. मात्र दोन वर्षांपासून पर्यटन ठप्प झाले आहे. पर्यटनाला बंदी असल्याने जिप्सी जाग्यावरच उभ्या आहेत. गाईडलाही कोणतेच काम मिळत नाही. परिणामी त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ येत आहे. पर्यायी रोजगाराची व्यवस्था आणि शासकीय मदत मिळावी यासाठी जिप्सी चालक, मालक संघटना आणि गाईड्स संघटनेने लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे साधारणत: २०० कुटुंब अडचणीत आले आहेत.

महाराष्ट्र राज्य गाईड युनियनचे सचिव भारत उईके म्हणाले, आता आम्हाला कोणतेच काम नाही. घरात जे असेल ते खायचे आणि दिवस काढायचा, अशी आमची अवस्था आहे. दिवसाला साधारणत: ६०० ते ७०० रुपये हंगामात मिळायचे परंतु आता तेही मिळत नाही. वन्यजीवांच्या संरक्षणासोबत माणसांच्याही समस्या सरकारने सोडवाव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बॉक्स

सुरक्षा ठेव परत करा

अभयारण्यात पर्यटनासाठी जिप्सी मालकांना एक हजार रुपये वार्षिक शुल्क आणि पाच हजार रुपये सुरक्षा ठेव ठेवावी लागते. परंतु दोन वर्षांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. सुरक्षा ठेव परत करून मदत म्हणून पाच हजार असे दहा हजार रुपये देण्याची मागणी वन्यजीव विभागाकडे संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु त्यालाही अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. ही मदत मिळाली तर बंद असलेल्या जिप्सीची दुरुस्ती करणे सोईचे होईल, असे जिप्सी मालक सांगतात.

बॉक्स

पर्यटनात मास्टर डिग्री पण बेरोजगारीचे संकट

नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी गेटवर गत १४ वर्षांपासून लेहेंद्र गेडाम हे गाईडचे काम करतात. त्यांच्या मालकीच्या दोन जिप्सी आहे. साकोली तालुक्यातील जांभळी सडक हे त्यांचे गाव. बालपणापासून जंगलाशी नातं असल्याने त्यांनी प्रवास व पर्यटन या विषयात नागपूर विद्यापीठातून मास्टर डिग्री मिळविली. एवढेच नाही तर वन्यजीव पर्यटनात पदव्युत्तर डिप्लोमाही घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ते एकमेव गाईड आहे. तेव्हापासून पिटेझरी गेटवर ते गाईडचे काम करीत आहेत. परंतु उच्च शिक्षण घेऊनही कोरोनामुळे त्यांच्यावर आता बेरोजगारीचे संकट आले आहे.

Web Title: Sanctuary tourism stalled for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.