रेती साठ्याचा लिलाव; महसूल प्रशासनाला चपराक
By Admin | Published: November 23, 2015 12:36 AM2015-11-23T00:36:26+5:302015-11-23T00:36:26+5:30
तुमसर तालुक्यातील आष्टी व पांजरा (रेंगेपार) येथील नदीकाठावर १,२२८ ब्रास अवैध रेती साठ्याचा महसूल प्रशासनाने लिलाव केला.
महाराष्ट्राची रेती मध्य प्रदेशात : आष्टीत १२ हजार तर पांजऱ्यात नऊ हजाराची वाढ, प्रसिद्धी न देता जाहीरनामा काढून लिलाव
मोहन भोयर तुमसर
तुमसर तालुक्यातील आष्टी व पांजरा (रेंगेपार) येथील नदीकाठावर १,२२८ ब्रास अवैध रेती साठ्याचा महसूल प्रशासनाने लिलाव केला. महसूल प्रशासनाने निर्धारित केलेल्या किमतीत केवळ १२ व ९ हजार रुपयांची वाढ झाली. १८ कंत्राटदार लिलावात सहभागी झाले होते. येथे कंत्राटदारांनी आपसात संगनमत करून महसूल प्रशासनालाच चपराक दिली. वृत्तपत्रात प्रसिद्धी न देता केवळ जाहीरनामा काढून ही लिलाव प्रक्रिया महसूल प्रशासनाने कधी राबविली, हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो. महाराष्ट्र सीमेतील रेती मध्यप्रदेशात जात असल्याची माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदी पात्रातून नियमबाह्य अवैध रेती उत्खनन करण्यात आली. आष्टी व पांजरा (रेंगेपार) नदी काठावर १२२८ ब्रास रेती डम्पींग करण्यात आली होती. या रेतीचा महसूल प्रशासनाने १९ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार डी.टी. सोनवाने, नायब तहसीलदार मडावी, गोंड तथा इतर कर्मचारी उपस्थित होते.
पांजरा (रेंगेपार) नदी काठावर ५२८ ब्रास अवैध रेती साठा होता. याची महसूल प्रशासनाने ७ लाख ९२ हजार इतकी किंमत निर्धारीत केली. लिलावात एकुण १२ कंत्राटदार सहभागी झाले. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत ४ ते ५ जणांनीच सहभाग घेतला. अवघ्या सात ते दहा मिनिटात लिलाव प्रक्रिया संपली. ८ लाख एक हजारावर बोली थांबली. मुळ किमतीत केवळ नऊ हजार रुपयांची वाढ झाली. येथे अनामत रक्कम १ लाख ९८ हजार रुपये ठेवण्यात आली होती. आष्टी येथे बावनथडी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करून ७०० ब्रास रेती नदी काठावर खासगी शेतजमिनीत ठेवली होती. महसूल प्रशासनाने या रेती साठ्याची किंमत १० लाख ५० हजार रुपये आकारली होती. येथे लिलाव प्रक्रियेत केवळ सहा कंत्राटदार सहभागी झाले होते. १० लाख ६२ हजार रुपयात हा रेती साठा लिलाव झाला. म्हणजे केवळ १२ हजारांची वाढ झाली. कंत्राटदारांनी महसूल प्रशासनाला येथे चपराक दिल्याची चर्चा शहरात होती.
महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला १५ दिवसांची रेती उचल करण्याची परवानगी दिली. ट्रॅक्टरकरिता एक ब्रास व ट्रक करिता दोन ब्रासची येथे परवानगी आहे. तुमसर पोलीस ठाण्यात टी.पी. चा हिशोब राहणार आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत रेतीची वाहतूक करण्यात यावी, असे बंधन महसूल प्रशासनाने केले आहे.
येथे आष्टी व पांजरा (रेंगेपार) घाट ज्या कंत्राटदाराला पूर्वी होता. त्याच कंत्राटदार व त्यांच्या सोबत्याला डम्पींग रेती साठा लिलावात मिळाला हे विशेष. ३० सप्टेंबर पर्यंत रेती घाटांची मुदत होती. त्यामुळे या रेतीला मोठी किंमत प्राप्त झाली आहे. एका ट्रकमध्ये चार ते पाच ब्रास रेती वाहतूक केली जाते. रेतीच्या वाहतुकीमुळे या मार्गावरील रस्त्याची दूरवस्था झाली आहे.