मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर घानोडच्या डंपिंगमधून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 11:38 PM2022-09-28T23:38:31+5:302022-09-28T23:39:01+5:30
घानोड गावात बंद असणाऱ्या डंपिंग यार्डमधून रात्री ट्रकमध्ये रेतीचा उपसा सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर घानोडच्या रेतीची नागपुरात वाहतूक केली जात आहे. याशिवाय वारपिंडकेपार आणि महालगावातून ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. डंपिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. अनधिकृत व्यवसाय बंद करण्यात येत असले तरी मोठे मासे खुलेआम रेतीची चोरी करीत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : गत दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या महाराष्ट्रातील घानोड गावातील डंपिंगमध्ये साठवणूक करण्यात आलेल्या रेतीचा उपसा मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर करण्यात येत आहे. रात्रीला बेसुमार ट्रक सिहोरा परिसरातून धावत आहेत. महालगाव आणि वारपिंडकेपार गावांच्या हद्दीतून रेतीची चोरटी वाहतूक सुरू झाली आहे. रेतीची चोरी थांबविणे आव्हान ठरले आहे. रेती, मुरूम चोरीत खननमाफियांचा उदय झाला असल्याचे चित्र परिसरात आहे.
बावनथडी नदी पात्रातून रेतीचा उपसा केल्यानंतर महाराष्ट्राच्या हद्दीत असणाऱ्या घानोड गावाच्या लगत मध्यप्रदेशातील रेतीमाफियांनी डंपिंग यार्ड गत दोन वर्षांपूर्वी निर्माण केले आहे. राज्यात रेती घाट लिलावात काढण्यात आले नसल्याने या डंपिंग यार्डमधून रेती माफियांनी विक्री केली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशातील कुंभली गावातील डंपिंग यार्डमधील रेती संपली असल्याने माफियांनी रेतीची शोधाशोध सुरू केली आहे. मध्यप्रदेशातील गावात असणाऱ्या डंपिंग यार्डमधील रेती संपल्याने त्यांनी महाराष्ट्रात असणाऱ्या रेतीच्या डंपिंग यार्डकडे मोर्चा वळविला आहे. घानोड गावात बंद असणाऱ्या डंपिंग यार्डमधून रात्री ट्रकमध्ये रेतीचा उपसा सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर घानोडच्या रेतीची नागपुरात वाहतूक केली जात आहे. याशिवाय वारपिंडकेपार आणि महालगावातून ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. डंपिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. अनधिकृत व्यवसाय बंद करण्यात येत असले तरी मोठे मासे खुलेआम रेतीची चोरी करीत आहेत.
सिहोरा परिसरातून जाणाऱ्या भंडारा बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर रोज ५० ते ६० ट्रक धावत आहेत. रेतीच्या चोरीत नवीन माफियांचा उदय झाला आहे. परिसरात रेती, मुरूम चोरीचा वाढता प्रकार सुरू झाला आहे. एका गावात तंमुसच्या अध्यक्षाने खुलेआम रेतीचा डंपिंग यार्ड तयार केल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
रस्ते खड्ड्यात, गावकरी वैतागले
- सिहोरा परिसरात वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोरे आहे. दोन्ही नद्यांच्या खोऱ्यातून रेतीचा बेसुमार उपसा सुरू झाला आहे. रेती, खननमाफियानी परिसरात थेट मोर्चा वळविला आहे. रेतीची ओव्हरलोडेड वाहतूक सुरू असल्याने रस्ते खड्ड्यात गेले आहेत. गावकरी रस्त्यावरील खड्ड्यामुळे वैतागले आहेत. या व्यवसायात राजकीय कार्यकर्ते, तंमुसचे अध्यक्ष गुंतलेले असल्याने गावकरी दबावात असल्याचे दिसून येत आहे.