रेतीचे ढिगारे जेसीबीने भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:18 PM2017-11-02T23:18:41+5:302017-11-02T23:19:03+5:30
‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल प्रशासन खळबळून जागे झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल प्रशासन खळबळून जागे झाले. १५० ते २०० ब्रास रेतीचा साठा तहसीलदारांच्या निर्देशानुसार जेसीबीच्या सहाय्याने रस्ता भुईसपाट करण्यात आला. शासन नियमानुसार महसूल प्रशासनाने रेती साठ्याचा पंचनामा करून रेतीची उचल करणे आवश्यक होते. परंतु रेतीचे ढिगारे भूईसपाट करण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने कां घेतला हे कळले नाही.
डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास रेतीचा अवैध साठा करण्यात आला होता. तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरू होता. डोंगरला गावातही ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे अजूनही पडून आहेत. बुधवारी लोकमतने ‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास डोंगरला-नवरगाव रस्त्यावर ८ ते १० तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार तथा तहसीलदार दाखल झाले. डोंगरला येथील जेसीबी घेऊन सर्व रेतीसाठा भुईसपाट करून रस्त्यावर ती पसरविण्यात आली.
अवैध गौण खनिजामध्ये रेतीचा समावेश होता. रेती ही मौल्यवान आहे. रेती अवैधरीत्या रेती घाटातून आणून रस्त्याच्या शेजारी डम्पिंग करून ठेवण्यात आली. नियमानुसार १५० ते २०० ब्रास रेतीचा पंचनामा करून ती जप्त करून रेतीची उचल करणे गरजेचे होती. ती भुईसपाट कां करण्यात आली. ही कारवाई करण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकाºयांची परवानगी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तामसवाडी व पांजरा रेतीघाटातून ही रेती अवैधरीत्या उत्खनन करण्यात आली. राजरोसपणे ती रस्त्याच्या शेजारी साठा करण्यात आला. तेव्हा मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कर्तव्य पार पाडले नाही. जिथे रेती साठा केला होता ती जागा वनविभागाची असल्याची माहिती आहे. डोंगरला गावातील रेती साठ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. महसूल प्रशासनाचे येथे दुर्लक्ष आहे. दरम्यान डोंगरला येथील पोलीस पाटील किसनलाल पटेल यांना काही रेती माफियांनी मारण्याची धमकी दिली, अशी माहिती आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत मधील परिचर खेमराज शरणागत याला रेतीमाफियांनी मारहाण केली. त्या प्रकरणाची तक्रार शरणागत यांनी तुमसर पोलिसात नोंदविण्याकरिता सायंकाळी गेले. डोंगरला गावात तणावाचे वातावरण आहे. महसूल प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती तर आरोप प्रत्यारोपाची वेळच आली नसती.
डोंगरला-नवरगाव रस्त्यावर असलेला रेतीचा अवैध साठा महसूल प्रशासनाने रस्त्याशेजारी पसरविला आहे. गावात व परिसरातील रेतीच्या अवैध साठ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. ही कारवाई करताना भेदभाव करू नये.
-देवचंद ठाकरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर.