घाटाशेजारी रेतीचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:42+5:30
अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली जाते. त्याठिकाणी वसूली करता येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या रेतीचे गावागावांत डम्पिंग केले जात असून अर्थपूर्ण संबंधातून महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. घाटाजवळील गावात डोंगरा एवढे रेतीचे ढिग कुणाच्याही दृष्टीस पडत असताना प्रशासनाला हा प्रकार दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वाधिक रेती डम्पिंग मोहाडी आणि तुमसर तालुक्यात होत असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यातील संमृद्ध नदीपात्र रेती तस्कारांसाठी पर्वणी ठरत आहे. प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी रेती तस्करी मात्र कमी व्हायचे नाव घेत नाही. तस्कारांचे एवढे मनोबल वाढले आहे की, आता गावागावांत रेतीची डम्पिंग केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील खोडगाव, मोहगाव देवी, नेरी, रोहा, सुकळी, निलज, कान्हळगाव, मुंढरी, खमारी बुज. बेटाळा तर तुमसर तालुक्यातील तामसवाडी, सीतेपार, ब्राम्हणी, हरदोली, सक्करदार यासह घाटानजीकच्या गावात रेतीची डम्पिंग केली जाते. रात्री जेसीबीच्या सहायाने उत्खनन करून ट्रॅक्टरच्या मदतीने रेती गावानजीक आणली जाते. शेकडो ब्रास रेती रात्रीतून आणून साठविली जाते. त्यानंतर ही रेती तेथून विकली जाते. यासाठी गावानजीक काही तस्करांनी ठिय्या मांडला आहे. मोहाडी तालुक्यातील घाटानजीकच्या गावात रेतीचे डोंगर तयार झाले आहे. अहोरात्र या ठिकाणाहून रेतीची वाहतूक केली जाते.
अवैध डम्पिंगचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. महसूल विभागातील तलाठ्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांना हा प्रकार माहित आहे. मात्र अद्यापपर्यंत रेती डम्पिंगप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महसूल विभागाचे कारवाई थेट वाहनांवर केली जाते. त्याठिकाणी वसूली करता येते. मात्र डम्पिंगच्या ठिकाणी वसुलीची सोय नसल्याने तेथे कारवाई होत नाही. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देवून डम्पिंग थांबविण्याची मागणी होत आहे.
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटावर खुलेआम रेती उत्खनन केले जात आहे. महसूल विभागाने पथक तयार केले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही. दुसरीकडे रेती तस्कर आक्रमक झाले असून हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. गत काही महिन्यात पोलीस आणि महसूल पथकावर हल्ले झाल्यानंतरही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे रेती तस्करांचे मनोबल वाढले आहे. या रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. वाहनांना जीपीएस प्रणाली लावून त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
जप्तीचे ट्रक जातात चोरी
महसूल पथकाने कारवाई केल्यानंतर ट्रक जप्त केले जातात. ते तहसील कार्यालयात लावले जातात. परंतु तुमसर तहसील कार्यालयातून अनेकदा जप्तीचे ट्रक चोरीस गेले आहे. महसूल अधिकारी याप्रकरणी पोलिसात तक्रार देवून मोकळे होतात. मात्र जप्तीचे ट्रक तेथून मुकसंमतीने पळविले जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हेच ट्रक पुन्हा अवैध रेती वाहतूक करताना दिसून येतात.
चालकाची भूमिका संशयास्पद
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चालक तस्करीला खतपाणी घालत असल्याचे अनेक प्रकरणात दिसून येते. वरिष्ठ अधिकारी धाड टाकण्यासाठी ज्या मार्गावर जाणार असतात त्या मार्गावरील वाहन चालकांना पूर्व सूचना दिली जाते. यामुळे धाड टाकणे शक्य होत नाही. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चालकांचे मोबाईल तपासले तर मोठे घबाड बाहेर येऊ शकते.