रेती उत्खनन; मध्यरात्री भर पावसात छापा, सात ट्रॅक्टरसह पोकलँड जप्त

By युवराज गोमास | Published: July 7, 2024 03:38 PM2024-07-07T15:38:42+5:302024-07-07T15:40:14+5:30

मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन प्रकरणी एक पोकलँड व सात ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.

sand mining; Raid in midnight rain, seizes Pokeland with seven tractors | रेती उत्खनन; मध्यरात्री भर पावसात छापा, सात ट्रॅक्टरसह पोकलँड जप्त

रेती उत्खनन; मध्यरात्री भर पावसात छापा, सात ट्रॅक्टरसह पोकलँड जप्त

भंडारा : मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन प्रकरणी एक पोकलँड व सात ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले. ही धाडसी कारवाई ७ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भर पावसात करडी पोलिसांनी केली. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. चोरीची रेती मुंढरी बुज येथील शासकीय रेती डेपोवर वाहतूक केली जाणार असल्याची माहिती आहे.

मुंढरी बुज वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक होत आहे. यासाठी तस्करांनी मोठी फिल्डींग लावली आहे. रेतीच्या काळाबाजारात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगणनमत असल्याचेही दिसून येत आहे. परिणामी माफियांचे मनोबल उंचावले आहे. ७ जुलै रोजी मध्यरात्री खबऱ्यांकडून करडी पोलिसांना रेती उपसा व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार करडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विलास मुंडे यांनी उपनिरीक्षक राजेश डोंगरे व पोलिस शिपाई खापर्डे, कोचे यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. सापळा कारवाईसाठी पोलिसांचे पथक मध्यरात्री १२ वाजता दरम्यान मुंढरी बुज येथील वैनगंगा नदीपात्रात धडकले.

कारवाईत सात विना क्रमांकाचे ट्रॅक्टरसह टाॅली व एक पोकलॅंड ताब्यात घेण्यात आली. त्यामधील दोन ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या उत्खनन केलेली रेती मिळून आली. घटनास्थावरून अंदाजे ७१ लाख ४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. प्रकरणी सहा ट्रॅक्टर करडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. तर एक ट्रॅक्टर व पोकलँडचा टायर पंचर असल्यामुळे नदीघाट परिसरात सील करण्यात आले आहे.

प्रकरणी सात ट्रॅक्टरचे चालक-मालक व पोकलँड चालक सुधाकर दामोधर बेलखोडे ३२, वलनी यांचे विरूद्ध पोलिस उपनिरिक्षक राजेश डोंगरे यांचे तक्रारीवरून करडी पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (३), ३/५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विलास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश डोंगरे, शिपाई खापर्डे व कोचे करीत आहेत.

रेती डेपोची चौकशी करा

मुंढरी बुज येथे शासकीय रेती डेपो सुरू आहे. यापूर्वी डेपोतून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची विक्री केली गेली. त्यामुळे विक्रीचा ताळेबंद बसविण्यासाठी त्यांचा हा खेळ सुरू होता. अवैध रेती उपसा करून वाहतूक करण्याच्या बेतात ट्रॅक्टर चालक-मालक होते. त्यामुळे शासकीय रेती डेपोची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी अडथळ्याची शर्यत पार केली

मध्यरात्री करडी पोलिसांना माहिती मिळताच सापळा कारवाईचा बेत आखला गेला. सर्वत्र काळाकुट्ट अंधार होता. मुसळधार पावसाने वातावरणात भयान शांतता होती. माफियांकडून प्रति हल्ला होण्याची भीती होती. परंतु, पाेलिसांनी या अडथळ्यांची पर्वा न करता छापा टाकला. या कारवाईचे आता सर्वत्र काैतूक होत आहे.

Web Title: sand mining; Raid in midnight rain, seizes Pokeland with seven tractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.