वैनगंगा पात्रात रेती चाेरी; नऊ जणांवर गुन्हा, १० ट्रॅक्टर जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:11 PM2023-02-21T17:11:09+5:302023-02-21T17:11:24+5:30
वलनी घाटावर कारवाई : पवनी पोलिसांनी आवळल्या रेती तस्कारांच्या मुसक्या
भंडारा : रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पवनी तालुक्यातील रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची माेहीम पोलिसांनी उघडली आहे. रविवारी एकाच दिवशी कारवाई करून नऊ रेती तस्कारांवर गुन्हा दाखल करून १० ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या धडक कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून खुलेआम रेती चोरी सुरू आहे. महसूल विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याने रेती तस्कर शिरजोर झाले आहेत. मात्र आता पोलिसांनी मोहीम उघडून रेती तस्करांना जेरबंद करणे सुरू केले आहे. रविवारी वलनी घाटावर रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती पवनी पोलिसांना मिळाली.
ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घाटावर धाड मारली. त्यावेळी रेतीचे उत्खनन करून सात ट्रॅक्टरमध्ये रेतीचे भरल्या जात होती. मात्र पोलिसांना पाहताच रेती तस्कर ट्रॅक्टर सोडून पसार झाले. पोलिसांनी सात ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ट्रॅक्टरमालकांचा शोध घेऊन सात जणांवार गुन्हा नोंदविला. त्यात मिथुन पांडुरंग भुरे (३०) निखिल प्रभाकर तिघरे (२४), नरेंद्र पंढरी जिभकाटे (४८), अमोल देवराव शेंडे (३८), अमोल श्रीधर हटवार (२५), नामदेव प्रभाकर मदनकर (४५), गुलाब महादेव तिघरे (३०) सर्व रा. वलनी, ता. पवनी यांचा समावेश आहे.
दुसरी कारवाई पवनी तालुक्यातील मोखारा ते खैरी मार्गावर करण्यात आली. पवनी पोलिसांची गस्त सुरू असताना दोन ट्रॅक्टरमध्ये रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहतूक परवानगीबाबत विचारले असता त्यांच्याकडे परवानगी आढळून आली नाही. त्यावरून चालक शिवचरण रामरतन दंडारे (२७) रा. मालची पुनर्वसन आणि सतीश आनंदराव करंजीकर (२५) रा. अड्याळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलीली रेती व ट्रॅक्टर पवनी येथील आगारात जमा करण्यात आले आहे.
पोलिस पाहताच ट्रॅक्टर सोडून तस्कर पसार
वैनगंगा नदीच्या कुर्झा घाटात रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती पवनी पोलिसांनी रविवारी मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक कुर्झा येथे पोहोचले. मात्र पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर सोडून रेतीतस्कर पसार झाले. घटनास्थळी असलेला ट्रॅक्टर आणि त्यातील रेती जप्त केली.