रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:57 PM2023-07-14T14:57:26+5:302023-07-14T14:57:56+5:30

प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात

Sand smugglers blocked the road from Pokhle to Belgaum Retighat, Khamari to Sitepar | रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट

रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट

googlenewsNext

इंद्रपाल कटकवार

भंडारा : गौण खनिजात जिल्ह्याला वरदान लाभलेल्या रेतीची खुलेआम तस्करी आजही सुरूच आहे. लिलाव न झालेल्या भंडारा तालुक्यातील बेलगाव या रेतीघाटातून तस्करांनी रेती अक्षरशः पोखरून काढली आहे. यात जड वाहतुकीने खमारी ते सीतेपार या रस्त्याची वाट लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.

भंडारा तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या खमारी ते सीतेपार या मार्गावर सध्या सकाळी व दुपारनंतर मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक सुरू आहे. बेलगाव नदीघाट हा वैनगंगा नदीच्या बॅकवॉटर क्षेत्रात येतो. या क्षेत्रातून अत्यंत उच्च दर्जाची रेती उपलब्ध होत आहे. दिवसभरात जवळपास दीडशे ट्रॅक्टर, तर ३० च्या दरम्यान टिप्परची वाहतूक होत आहे. याच माध्यमातून ४०० पेक्षा जास्त ब्रास रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून येते.

यासाठी सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या खमारी ते सीतेपार या रस्त्यावरून ही जड वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत या पाच किलोमीटर रस्त्याचे सिमेंट व डांबरीकरण करण्यात आले आहे. रेतीच्या जड वाहतुकीने या रस्त्याची वाट लावली जात आहे. यावर ग्रामस्थ काहीच बोलायला तयार नाहीत, हे येथे उल्लेखनीय.

कच्च्या रस्त्याने होते रेतीचे वहन

बेलगाव रेतीघाटातून रेतीचा उपसा केल्यानंतर खमारी ते सीतेपार या मुख्य मार्गाला जोडणाऱ्या कच्च्या रस्त्याने रेतीची वाहतूक होत आहे. याच परिसरात रेतीची डम्पिंग करून सकाळपूर्वीच रेतीचे वहन केले जाते. दुसऱ्या दिवसापासून असाच प्रकार पुन्हा सुरू होतो.

उचल केल्यावर टाकली जाते माती

ज्या पडीक क्षेत्रात रेतीची डम्पिंग केली जाते तिथे रेतीची उचल केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास क्षेत्रातून माती खोदून तिथे पसरवली जाते. जेणेकरून येथे कधीही रेतीची डम्पिंग केली नव्हती, असे दर्शविले जाते.

रोज ४०० ब्रास रेतीची उचल

बेलगाव रेतीघाट परिसर हा वनक्षेत्रांतर्गत मोडतो. त्यामुळेच या घाटाचे लिलाव झाले नाही. याचाच फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. या घाटातून अंदाजे जवळपास ४०० पेक्षा जास्त ब्रास रेतीचे वहन दररोज होत आहे. रोज सकाळी येथे रेतीची नवीन ट्रिप पाहायला मिळते. लिलाव नसतानाही रेतीचा उपसा करण्याची हिंमत रेती तस्करांनी दाखवली आहे.

Web Title: Sand smugglers blocked the road from Pokhle to Belgaum Retighat, Khamari to Sitepar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.