तहसीलदारांच्या बचावासाठी रेती तस्कर मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:52+5:302021-07-29T04:34:52+5:30
स्वाक्षरी मोहीम सुरू मोहाडी : लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या तहसीलदारांना वाचविण्यासाठी आता रेती तस्कर पुढे सरसावले असून त्यांच्या बचावासाठी ...
स्वाक्षरी मोहीम सुरू
मोहाडी : लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या तहसीलदारांना वाचविण्यासाठी आता रेती तस्कर पुढे सरसावले असून त्यांच्या बचावासाठी नागरिकांची स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू केली आहे.
मोहाडीच्या तहसीलदारांना ट्रॅक्टरद्वारे रेती चोरी करण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारत असताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यांना जामीन मिळाल्याने व निलंबनाचा आदेश मंत्रालयातून येण्यास वेळ असल्याने सध्या ते मोहाडी तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. परंतु काहींना उपयोगी असलेल्या या तहसीलदारांच्या जाण्याच्या कल्पनेने मोठ्या रेती तस्करांचा जीव कासावीस झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता हेच तहसीलदार मोहाडी येथे राहावे यासाठी एक निवेदन तयार केले आहे. तहसीलदारांना चुकीच्या पद्धतीने फसविण्यात आले, फसविणारे रेतीचा व्यवसाय करीत नाही, तहसीलदार देवीदास बोंबुर्डे कर्तव्यनिष्ठ असल्याने त्यांना मोहाडीतच ठेवण्यात यावे, अशी मागणी त्या निवेदनातून करण्यात आली आहे. आता रेती तस्करांनी घेतलेल्या पवित्र्याची चर्चा सुरू आहे.
रेती तस्करी पुन्हा जोमाने
तहसीलदारावर एसीबीची कारवाई झाल्याने रेती तस्करी काही दिवस थांबेल असे वाटले होते, परंतु याउलट रेती तस्करी जोमाने सुरू झाली आहे. चार दिवसापासून रोहाकडून येणाऱ्या टिप्पर व ट्रॅक्टर ची संख्या अधिकच वाढली असून कुशारी फाटा मोहाडी येथून दिवसभर शहराच्या आतून व राज्य मार्गावरून डोंगरगाव, आंधळगावकडे अवैध रेती वाहतूक बिनधास्त सुरू झाली आहे.