रेती तस्करांची जिल्ह्यात दहशत; लाेकेशन व्हायरल करण्यापासून हल्ल्यापर्यंत मजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 02:12 PM2022-11-04T14:12:00+5:302022-11-04T14:12:49+5:30
राजकीय आश्रय
भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, अधिकाऱ्यांचे लाेकेशन व्हायरल करणे, तहसीलदारांवर थेट जेसीबीच्या बकेटने हल्ल्याचा प्रयत्न अशा एक ना अनेक घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. रेती तस्करांची एवढी दहशत आहे की, अधिकाऱ्यांना आत्मसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर घेऊन कारवाईसाठी जावे लागते. राजकीय आश्रयातून रेती तस्कर शिरजाेर झाले असून महसूल प्रशासन या रेती तस्करांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे.
माेहाडी तालुक्यातील रेती घाटावर कारवाईसाठी गेलेले तहसीलदार दीपक करंडे यांच्यावर रेती तस्कराने जेसीबीच्या बकेटने हल्ल्याचा एकदा नव्हे दाेनदा बुधवारी सायंकाळी प्रयत्न केला. सुदैवाने तहसीलदारांजवळ आत्मसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर असल्याने त्यातून हवेत फायर केल्याने माेठा अनर्थ टळला. अन्यथा जेसीबीच्या बकेटच्या एका फटक्याने माेठा अनर्थ घडला असता. गत दहा महिन्यात अशा अनेक घटना जिल्ह्यात घडला आहेत.
२७ एप्रिल राेजी पवनी तालुक्यातील बेटाळा घाटावर कारवाईसाठी गेलेले भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड यांच्यावर १५ ते २० रेती तस्करांनी हल्ला केला हाेता. त्यापूर्वी लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे २५ एप्रिल राेजी तहसीलदाराच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. भंडारा शहरातील गांधी चाैकात ३ जून राेजी उपविभागीय अधिकारी आकाश अवतरे यांना रेती तस्करांनी धक्काबुक्की केली हाेती. तलाठी आणि पाेलीस कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकरण तर नेहमीचीच बाब झाली आहे.
कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे लाेकेशन व्हाॅट्सॲपवर व्हायरल करण्याचा प्रकार तुमसर तालुक्यात २७ ऑक्टाेबर राेजी उघडकीस आला हाेता. याप्रकरणी २२ जणांवर गुन्हे दाखल करून सात जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांचे लाेकेशन व्हायरल करणे नित्याचीच बाब झाली आहे. अधिकारी कुठे धाड टाकण्यासाठी जातात याची माहिती तस्करांपयर्यंत महसुलातीलच काही कनिष्ठ कर्मचारी देत असल्याची माहिती आहे.
रेती तस्कर एवढे आक्रमक झाले आहेत की ते कुणाचेही जुमानत नाही. राजकीय आश्रय असल्याने आपली यातून सहीसलामत सुटका हाेईल याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे. एकीकडे शासन रेती घाटांचा लिलाव करीत नाही आणि दुसरीकडे रेती घाटांवर खुलेआम लूट सुरू आहे.
आत्मसंरक्षणासाठी अधिकाऱ्यांजवळ रिव्हाॅल्व्हर
रेती तस्करांची एवढी दहशत निर्माण झाली आहे, की आता महसूल अधिकाऱ्यांना आत्मसंरक्षणासाठी स्वत:जवळ रिव्हाॅल्व्हर बाळगावी लागत आहे. माेहाडी येथील राेहा घाटावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तहसीलदाराने दाेन राऊंड हवेत फायर केले. अधिकारी आपल्या संरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर जवळ बाळगतात. मात्र, मंडळ अधिकारी, तलाठी यांना काेणतीही सुरक्षा नसते. ते कारवाईसाठी जातात तेव्हा साधे पाेलीस संरक्षणही मिळत नाही.
विविध हल्ल्यातील आराेपी माेकाटच
पवनी तालुक्यातील बेटाळा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला असाे की, महसूल पथकावर झालेला हल्ला असो, यातील अनेक आराेपी माेकाट आहेत. गत गुरुवारी एसडीओचे लाेकेशन व्हायरल करणाऱ्या २२ जणांपैकी केवळ सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आराेपीही लवकरच जामिनावर सुटतात. त्यामुळे त्यांची हिंमत वाढते. अशा रेती तस्करांवर आता हद्दपारीसह कडक कारवाई करण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी आतापर्यंत कुणी पुढाकार घेतला नाही.