पवनीतील प्रकरणाने रेतीतस्करीची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:51+5:30

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस्करांसाठी रान मोकळे आहे. नागपूरसह मध्यप्रदेशातील रेती तस्कर स्थानिकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करताना दिसतात.

Sand smuggling opened by the case of Pavani | पवनीतील प्रकरणाने रेतीतस्करीची पोलखोल

पवनीतील प्रकरणाने रेतीतस्करीची पोलखोल

Next
ठळक मुद्देतस्करांचे मनोबल वाढले : तहसीलदारांचे वाहन उडविण्यापर्यंत गेली मजल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण यंत्रणा कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त असताना दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटांवर रेती तस्करी जोमात सुरु आहे. कारवाईसाठी गेलेल्या पवनी तहसीलदारांचे वाहन टिप्परने उडविण्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तर या घटनेने जिल्ह्यातील रेती तस्करीची पोलखोल झाली.
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा, सूर, बावनथडी या नद्यांसह इतर घाटांवर मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी रेतीघाटाचे लिलाव केले जातात. मात्र गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे तस्करांसाठी रान मोकळे आहे. नागपूरसह मध्यप्रदेशातील रेती तस्कर स्थानिकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करताना दिसतात. तुमसर, पवनी तालुक्यातील रेती घाटावर अहोरात्र रेतीचा उपसा सुरु असतो. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनने संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात रेतीतस्करी थांबल्याचे दिसत होते. परंतु गत दोन आठवड्यांपासून पुन्हा रेती तस्करीने उचल खाल्ली आहे. मशीनच्या सहाय्याने उत्खनन करून त्याची ट्रक, टिप्परद्वारे वाहतूक केली जाते. महसूल आणि पोलीस यंत्रणा कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त आहेत. याच संधीचा फायदा तस्कर घेत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी पवनी तालुक्यातील रेतीघाटावरून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती तहसीलदार गजानन कोकड्डे यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह निलज येथे दोन टिप्पर थांबविले. चौकशी सुरु असताना ट्रक नागपूरकडे पळून जात होते. त्यावेळी टिप्परचा पाठलाग केला तेव्हा तहसीलदारांचे खासगी वाहन उडविण्याचा प्रयत्न टिप्परने केला. यात तहसीलदारांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने तहसीलदारांना दुखापत झाली नाही. या घटनेवरून रेती तस्करांचे मनोबल किती वाढले याचा अंदाज येतो. जिल्ह्यातील रेती तस्करीला अनेकांचे अभय असल्याचे बोलले जाते. महसूल आणि पोलीस यंत्रणाही या प्रकाराला तेवढीच जबाबदार आहे. दोन वर्षापूर्वी मोहाडी तालुक्यात पोलिसांच्या गस्ती पथकावर रेती तस्करांनी हल्ला केला होता. त्यात एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला होता. अनेकदा महसूल पथकावरही हल्ले करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या रेती तस्करीला अर्थपूर्ण व्यवहारातून कुणीही पायबंद घालताना दिसत नाही.

नागपूरच्या रेती तस्करांना अटक
पवनी : तहसीलदारांच्या कारला धडक देऊन पळणाऱ्या रेती तस्करांना जेरबंद करण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. सोमवारी पहाटे कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार गजानन कोकड्डे यांच्या खासगी वाहनाला रेती तस्करीच्या टिप्परने धडक देऊन पळ काढला होता. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून आरोपी मो.कलाम मो अजीज खान (३६), रबूल नयमुल खान (४०), अतेकुल रहमान कादीर खान (३२) सर्व राहणार खरबी नागपूर आणि सरफराज उर्फ कल्लू सकीम खान (२३) रा.नागपूर यांना अटक करण्यात आली. यासोबतच १० ब्रास रेती, दोन टिप्पर आणि एक स्कॉर्पीओ कार पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: Sand smuggling opened by the case of Pavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.