पवनी तालुक्यात रेतीची तस्करी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:25+5:302021-01-13T05:32:25+5:30

रात्रभर उपसा, भोजापूर येथे साठा महसूल प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक चिचाळ : जिल्ह्यात मानवी संवेदना शून्य करणारी घटना घडत ...

Sand smuggling is rampant in Pawani taluka | पवनी तालुक्यात रेतीची तस्करी जोरात

पवनी तालुक्यात रेतीची तस्करी जोरात

Next

रात्रभर उपसा, भोजापूर येथे साठा

महसूल प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक

चिचाळ : जिल्ह्यात मानवी संवेदना शून्य करणारी घटना घडत असताना दुसरीकडे मात्र पवनी तालुक्यातील रेती माफिया महसूल प्रशासनाला हाताशी धरून रात्रीला रेतीची तस्करी करीत आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रशासन गुंतल्याने रेती तस्करांनी संधीचे सोने करण्यासाठी कंबर कसली आहे. भोजापूर रेती घाटावर रात्रभर ट्रॅक्टरने उपसा करून नदीकाठावरील पाण्याच्या जलकुंभाजवळ रेतीची डम्पिंग केली जात आहे. गेल्या आठवड्यापासून रात्रीला या घाटावर वाहनांची रेलचेल आहे. रात्री उपसा केलेली रेती पहाटे ३ ते ४ वाजताच्या दरम्यान नागपूर, अमरावती, वर्ध्याकडे लांबविली जाते. मात्र महसूल प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीचे भूमिकेत वावरत आहे. पवनी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी पात्रातून महसूलशी आर्थिक साटे-लोटे करून रेती तस्कर उपसा करीत आहेत. भोजापूर रेती घाटावर रात्रभर ट्रॅक्टर, टिप्परची वर्दळ वाढली आहे. उपसा केलेली रेती पात्राबाहेरील पंचनामा केलेला ढिगाऱ्यावर टाकून तस्करी केली जाते. हा गोरखधंदा अनेक दिवसापासून सुरू आहे. नदीपात्रातून मध्यरात्री रेतीचा उपसा केला जात असल्याने या मागे कोणाकोणाचे लागेबांधे आहेत, याची चर्चा सध्या भोजपूर परिसरात सुरू आहे. कोणाच्या तरी राजकीय वरदहस्तशिवाय हे काम होणार नाही हेही सर्वांना ज्ञात आहे. परंतु सध्या हा व्यवसाय जोरात सुरू आहे. मध्यरात्री टिप्परने रेतीची वाहतूक करीत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल खात्याने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोणतेही ग्रामस्थ गाव, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर यांच्याविषयी बोलत आहेत. लोकप्रतिनिधी मात्र या प्रकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही. रात्रभर रेती उपसा सुरू असल्यामुळेच पहाटेपर्यंत गुडेगाव, धानोरी, भोजापूर, खातखेडा मार्गावर टिप्परची वर्दळ असते.

बॉक्स

आदेशाला केराची टोपली

जिल्ह्यात पवनी तालुक्यात रेती तस्करीने उच्चांक गाठल्याने पवनीचे नाव जिल्ह्यात बदनाम होत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी एका आंदोलनाला भेटीदरम्यान तहसीलदार नीलिमा रंगारी यांना रेती तस्करावर कारवाई करा अन्यथा चौकशीला तयार राहा, असे सांगितले होते. जिल्ह्यात रेती तस्कराच्या टिप्परने एका महिलेचा बळी गेल्याने आमदार भोंडेकर यांनी रेती साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्ह्याची नोंद करून जप्ती करण्याचे सांगितले. मात्र काही दिवसातच जैसे थे परिस्थिती झाली आहे.

Web Title: Sand smuggling is rampant in Pawani taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.