लिलाव नसतानाही जागोजागी रेती साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:00 AM2020-06-13T05:00:00+5:302020-06-13T05:01:05+5:30
रेतीची वाहतूक करीत असताना कारवाई झाल्यास संगनमत केले जाते. ती रेती नसून धानाचा कोंढा होता, असा भासही निर्माण केला जातो. रेतीवर कोंढा टाकून प्रकरण दाबले जात असल्याचीही बाब समोर येत आहे. दुसरीकडे गत तीन महिन्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंवा टिप्परने रेतीची वाहतूक होत असल्याचे प्रकार घडले आहे. घटनास्थळाहून रेती पाडून पळून जाण्याचा प्रकारही नेहमी घडतो.
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उच्च दर्जाची व गुणवत्ता असलेली रेती वैनगंगा नदीच्या पात्रातून जिल्ह्याला लाभलेली नैसर्गीक देणगी आहे. मात्र या देणगीची रेतीतस्कर प्रचंड लूट करीत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसतानाही ठिकठिकाणी रेतीचे साठे दिसून येत आहे. एकंदरीत रेती तस्करांची गुंडागर्दी वाढली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये मोहाडी येथे पोलीस पथकावर रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला केला होता. यात एका पोलिस उपनिरीक्षकाला गंभीर दुखापत झाली होती. अन्य कर्मचारीही चांगलेच जखमी झाले होते.
पवनी, लाखांदूर तालुक्यातही रेतीतस्करांनी महसूलसह पोलिसांनाही लक्ष्य करीत हल्ले केले. जीवानिशी ठार मारण्यापर्यंत मजल या रेतीतस्करांची पोहचली आहे. पवनी तालुक्यात तर ठिकठिकाणी रेतीची डम्पिंग पहायला मिळत आहे. यातून मोहाडी व तुमसर तालुकाही सुटलेला नाही.
लाखांदूर तालुक्यातही रेतीची वारेमाप लुट सुरू आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यासमोर नैसर्गीक संपत्तीची लुट होत असताना जीवाच्या आकांतापोटी कुणीही धाडस करण्याचे सामर्थ दाखवित नाही.
दुसरीकडे महसूलसह काही पोलीस विभागाशी साटेलोटे करून या गौण खनिजाची लुट करीत असल्याचीही बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे आता तर रेती माफियांनी विविध शक्कल लढवून रेतीची चोरी सुरू केली आहे.
रेती नव्हे तो तर धानाचा कोंढा
रेतीची वाहतूक करीत असताना कारवाई झाल्यास संगनमत केले जाते. ती रेती नसून धानाचा कोंढा होता, असा भासही निर्माण केला जातो. रेतीवर कोंढा टाकून प्रकरण दाबले जात असल्याचीही बाब समोर येत आहे. दुसरीकडे गत तीन महिन्यात विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर किंवा टिप्परने रेतीची वाहतूक होत असल्याचे प्रकार घडले आहे. घटनास्थळाहून रेती पाडून पळून जाण्याचा प्रकारही नेहमी घडतो. प्रशासक फक्त पकडलेली रेती जप्त करून सुटकेचा नि:श्वास सोडते.
कोट्यवधींचा महसूल पाण्यात
जिल्ह्यात दशकभरापुर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. काही रेतीघाटांचे प्रकरण न्यायालयीन प्रकरणात आहे. तर गोसेखुर्द धरणाचे पाणी अडविल्यामुळे काही रेतीघाट पाण्याखाली आले आहेत. दरम्यान जे रेतीघाटांचे लिलाव केले जातात त्यापैकी त्यांची प्रक्रियाही पूर्ण व्हायची आहे. असे असले तरी रेतीघाटातून रेतीचा उपसा सुरूच आहे. परिणामी कोट्यवधींचा महसूल बुडत असताना जिल्हा खनिकर्म विभागही गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे वाळूमाफियांना रान मोकाट करून दिले काय, अशी चर्चा आहे.
ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच अधांतरी
रेतीघाटातून रेतीची वारेमाप लुट होत असताना त्यावर निगरानी ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा फौजफाटा २४ तास ठेवणे अशक्य बाब आहे. अशावेळी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेवून महत्वाच्या रेतीघाटांवर नजर ठेवण्यात येणार होती. याची रितसर घोषणाही तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र घोषणा हवेतच राहिली. ड्रोन कॅमेऱ्याचा विषय अधांतरी आहे.