अटीशर्तीचा भंग करून रेतीची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:47 PM2018-04-20T22:47:16+5:302018-04-20T22:48:14+5:30
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ मधील वाळू, रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रातून व देव्हाडा खुर्द ता. मोहाडी हद्दीतून अवैध रस्ता तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ मधील वाळू, रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रातून व देव्हाडा खुर्द ता. मोहाडी हद्दीतून अवैध रस्ता तयार करण्यात आला आहे. पर्यावरण कायदा, वाहतूक व रेती घाटांचे सर्व नियम पायदळी तुडवून रात्रंदिवस अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने पिकांचे नुकसान झाले.
सदर घाटातील रेतीची अवैध वाहतूक कायमची बंद करण्याची मागणी देव्हाडाचे माजी सभापती झगडू बुद्धे व ग्रामस्थांनी केली. मात्र, अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरप्रकार सुरू असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही.
तिरोडा तालुक्यातील मौजा घाटकुरोडा घाट क्रमांक २ चे घाट मालक एस.आर. कंन्ट्रक्शन घाटकुरोडा यांनी मौजा देव्हाडा बुज येथील सरहद्दीतील वैनगंगा नदीपात्रातून कोणतीही पूर्व परवानगी न घेता रस्त्याचे अवैध बांधकाम केले. सदर रस्त्याबाबत अनेकदा महसूल प्रशासन व खनिकर्म विभाग भंडारा व गोंदिया जिल्हा यांना तक्रार केल्यानंतरही रस्त्याचे अवैध बांधकाम थांबविण्यात आले नाही.
संबंधित घाटकुरोडा रेती घाटाचा रस्ता अवैध असून अवैध रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात यावी यासबंधाचे पत्र ३ नोव्हेंबर २०१७ व ७ नोव्हेंबर २०१७ तसेच ९ नोव्हेंबर २०१७ रोजी देण्यात आले होते. त्यावेळी देव्हाडा नदीपात्रातून सुरू असलेली रेतीची अवैध वाहतूक बंद करण्यासंबंधाची सुचना व आदेश मोहाडी प्रशासनाने दिल्या होत्या. त्या आधारावर बेकायदेशिर रेतीची वाहतूक बंद करण्याची कार्यवाही तिरोडा तालुका महसूल प्रशासनाने करावी, अशी मागणी देव्हाडा ग्रामस्थांनी केली होती. परंतू अद्यापही त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. रस्त्यावरून अवैध वाहतूक सुरूच आहे.
रस्ता तयार करताना घाटमालकांनी घाटकुरोडा व देव्हाडी गावातील शेतकऱ्यांची रस्त्याचे बांधकाम करताना परवानगी घेतली नाही. शेतशिवारातून बळजबरीने रस्ता तयार करण्यात आला. परिणामी बागायती व रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसान भरपाई देण्यासही घाट मालकांचा विरोध असल्याने शेतकऱ्यांनीही रेतीची वाहतूक करण्यास हरकत घेतली, तेव्हा प्रशासनाने याकडेही दुर्लक्ष केले आहे.