जिल्ह्यात संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:01 PM2018-08-27T23:01:24+5:302018-08-27T23:01:55+5:30
दहा दिवसांच्या अंतराने वरुण राजाने पुन्हा भंडारा जिल्ह्यावर कृपादृष्टी बरसविली. मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून सरासरी १४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. या पावसामुळे धानपिकाला सध्यातरी धोका नसल्यातरी अतिपावसाने काही दिवसात धानपिक संकटात येण्याची चिन्हे नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दहा दिवसांच्या अंतराने वरुण राजाने पुन्हा भंडारा जिल्ह्यावर कृपादृष्टी बरसविली. मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून सरासरी १४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. या पावसामुळे धानपिकाला सध्यातरी धोका नसल्यातरी अतिपावसाने काही दिवसात धानपिक संकटात येण्याची चिन्हे नाकारता येत नाही.
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात कमी जास्त प्रमाणात मागील २४ तासात पाऊस बरसला सर्वात जास्त पावसाची नोंद लाखांदूर तालुक्यात करण्यात आली. यात अनेक घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी अधिक आहे. मागील २४ तासात भंडारा तालुक्यात ७ मिमी., मोहाडी १० मिमी., तुमसर ६.१ मिमी, पवनी १८ मिमी, साकोली ९ मिमी, लाखांदूर ४३.५ मिमी, तर लाखनी तालुक्यात ७.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
१ जून ते आजपर्यंत ६,२०९ मिमी पाऊस बरसला असून त्याची सरासरी ८८७.१ मिमी अशी आहे. गतवर्षी याच तारखेला ६२७ मिमी पाऊस बरसला होता. परिणामी मागील वर्षीच्या तुलनेत २५० मिमी पाऊस अधिक बरसला आहे. हवामान खात्याच्या सुचनेनुसार मंगळवारीही जिल्ह्यात मुसळधार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत.
यावर्षी हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला असून शेतकरी ही खरीप हंगामाचा तयारीला जोमाने लागला होता. मृग नक्षत्रानंतर जवळपास २० दिवस पावसाने पाठ फिरविल्यामुळे १८ टक्के रोवणी रखडली होती. मात्र दहा दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीत धान पिकांना जीवदान मिळाले. सध्या स्थितीत धानपिकाला पाण्याची गरज नाही. परंतु या पाण्यामुळे पिकाला धोकाही नाही. मात्र पाण्यात सातत्यपणा असल्यास धान सडण्याची शंकाही जाणकारांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जनजीवन प्रभावीत
पालांदूर : मागील आठवड्यात अतिवृष्टीत होत नदी-नाले दुधळी भरुन वाहले. नदी नाल्याकिनारी शेत पाण्याखाली गेले होते. तीन ते चार दिवसांची विश्रांती घेत पून्हा रविवारपासून रिपरिप करीत हजेरी लावल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. मात्र रिपरिप पावसाने धानपिकाला पोषकता मिळाल्याने धान पिक जोमात दिसत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षात पावसाचे प्रमाण समाधानकारक दिसत आहे. जिल्ह्यातील तलाव, बोळी, जलाशय ६० टक्केपर्यंत भरले असल्याने धानपिकाची हमी वाढली आहे. वर्तमान धानाचा हंगाम नजरेत भरणारा असून शेतकरी समाधानी दिसत आहे. हलके धान गर्भात असून असाच पावसाचा जोर राहिल्यास पोळ्यापर्यंत धान निसवतील यात शंका नाही.
पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून सोमवारला (ता.२७) तालुक्यातील नदी व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अनेक गावांंमध्ये पुराचे पाणी शिरले. तर सततधार पावसामुळे खैरी/पट येथील चार घरे पडली. तर चौरास भागातील नदी काठावरील अनेक गावातील घरांमध्ये पाणी घुसले. मागिल आठवड्यात पडलेल्या पावसात बारव्हा येथील फुलाबाई जाधव रहेले यांचे राहते घर जमीनदोस्त होऊन दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. डांभेविरली येथील दादाजी शिवरकर यांचे घर पुर्णपणे पडले. मात्र सुदैवाने कुठेही प्राणहानी झाली नाही. वैनगंगा नदीकाठावर असलेल्या खैरणा गावातील सरस्वता रावसाहेब फाये नामक ६५ वर्षीय विधवा महिलेच घर पडल्याने सरस्वताबाई जखमी झाली आहे. तर येथीलच शामराव पचारे यांचे देखील घर पडले आहे. मेंढा - चप्राड येथे सुद्धा अतिवृष्टीने राधाबाई धनशाम सिंह पवार ह्या विधवा महिलेच घर पुर्णपणे जमीनदोस्त झाले. तर येथीलच सरीता प्रकाश वावरे यांचे घर पडले असून त्यांना आठ वर्षा आतील तिन मुली आहेत. त्यांचा परीवार उघड्यावर आला आहे. ओपारा या गावात पुराच्या पाण्याने थैमान घातले. या गावात जवळपास २० घरात पुराचे पाणी गेले. तर ५ घरांच्या भिंती पडल्या आहेत. मात्र कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. त्याच प्रमाणे तालुक्यातील पुयार, कन्हाळगाव येथे जाण्या-येण्याचा मार्ग बंद असल्याने संपर्क तुटला होता. खैरी/पट येथे चार घरे पडल्याची घटना घडली. येथील बकाराम भागडकर, वनिता राऊत, नागो राऊत हे दुसऱ्यांच्या घरी वास्तव्यास आहेत. यासह लाखांदुर नगरातील प्लाँटवर देखील नाल्याच्या पुराने थैमान घातल्याने अनेक लोकांच्या घरात पुराचे पाणी गेले. त्यापैकी आठ लोकांच्या घरातील धान्याचे व इतर वस्तूंचे नुकसान झाले. त्याच प्रमाणे तालुक्यातील कित्येक गावातील शेतांमध्ये पाणी घुसून शेकडो एकर जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज देखील पावसाची सततधार सुरू असल्याने नदी व नाल्या काठावरील गावांंना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात लाखांदुरचे तहसीलदार संतोष महले म्हणाले, तालुक्यातील ज्या गावात घरांची पडझड झाली आहे. त्याचे नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले असुन, संपूर्ण तालुक्यातील सर्वे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानीचा अंदाज बांधता येईल.