सानूच्या भाषणाचं सोशल मीडियावर गारुड; राज्यभर होतंय कौतुक - पाहा, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 06:59 PM2021-08-18T18:59:09+5:302021-08-18T19:01:06+5:30
विविध उपक्रमांसाठी खराशीची जिल्हा परिषद शाळा पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. याच शाळेतील पाचव्या वर्गातील सानू घोनमोडे या विद्यार्थिनीच्या वक्तृत्वाचे सोशल मीडियावर गारुड सुरू आहे.
भंडारा - ओघवती वाणी आणि प्रत्येक शब्दातून दिसणारा आत्मविश्वास, असे पाचव्या वर्गातील एका विद्यार्थिनीचे आवेशपूर्ण भाषण सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. वक्तृत्वाची देणगी लाभलेली ही चिमुकली आहे सानू भाऊराव घोनमोडे. भंडारा जिल्ह्यातील खराशी येथील जिल्हा परिषद डिजीटल पब्लीक स्कुलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात तिने दिलेल्या भाषणाचे राज्यभर कौतुक होत आहे. (Sanu's speech Popular on social media, Appreciation is happening all over the state)
विविध उपक्रमांसाठी खराशीची जिल्हा परिषद शाळा पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. याच शाळेतील पाचव्या वर्गातील सानू घोनमोडे या विद्यार्थिनीच्या वक्तृत्वाचे सोशल मीडियावर गारुड सुरू आहे. ऑनलाइन झालेल्या या सोहळ्यात सानूने दिलेले भाषण एखाद्या प्रसिद्ध वक्त्यालाही लाजवेल असे आहे. भाषणाची सुरुवातच ती एवढी दमदार करते की सहा मिनिटांचे भाषण पूर्ण एकल्याशिवाय कुणी थांबत नाही. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास, शब्दांची योग्य निवड आणि आवेश यामुळे तिचे राज्यभर कौतुक होत आहे. तिने या सोहळ्यात सर्व विषयाला स्पर्श करीत कोरोनासारख्या महामारीवरही भाष्य केले. तिचा हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियातून सर्वत्र व्हायरल होत आहे.
ग्रामीण टॅलेंट -
सानू घोनमोडे ही लाखनी तालुक्यातील मचारणा येथील रहिवासी आहे. ८ किलोमीटर अंतरावरील खराशी येथील शाळेत ती पाचव्या वर्गात शिकते. वडील उच्चशिक्षित असूनही नोकरी न मिळाल्याने चरितार्थासाठी गावात किराणा दुकान चालवितात. वडीलांनी तिच्यातील वक्तृत्वगुण हेरले. ऑनलाइन वक्तृत्व मार्गदर्शनाचा तिने क्लास केला आणि यावर्षी तिच्या वडीलांनी मार्गदर्शन केलेले भाषण तिने खराशीच्या शाळेत सादर केले.
असे विद्यार्थी आम्हा शिक्षकांचे भाग्य -
खराशी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैयद आणि सानूचे वर्गशिक्षक सतीष चिंधालोरे यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. ती वर्गातही हुशार आहे. एखादा विषय समजला नाही, की ती पटकन विचारते. ग्रामीण भागातही प्रचंड टॅलेंट आहे. ते ओळखणे गरजेचे आहे. असे विद्यार्थी मिळणे हे आम्हा शिक्षकांचे भाग्य आहे, असे वर्गशिक्षक सतीष चिंधालोरे सांगतात.