साकोलीची भूमेश्वरी गहाणे जिल्ह्यात अव्वल
By admin | Published: May 26, 2016 01:30 AM2016-05-26T01:30:52+5:302016-05-26T01:30:52+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला.
निकाल ८८.३५ टक्के : लाखनी आघाडीवर तर लाखांदूर पिछाडीवर
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के इतका लागला. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाची भूमेश्वरी केशव गहाणे ही विद्यार्थिनी ९२.३० टक्के (६०० गुण) घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. यावर्षीच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी केतकी संजय पदवाड आणि जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार यांनी ९१.८४ टक्के (५९७ गुण) घेऊन जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय आले आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची रक्षंदा कोल्हेकर हिला ९१.६५ टक्के (५९६ गुण) घेऊन तृतीय आली आहे.
बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागात दुसऱ्या स्थानावर आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३१ इतकी असून मुलांची टक्केवारी ८५.८६ इतकी आहे. जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सरगम चंद्रकांत ठाकरे हिला ९१.५३ टक्के, नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या रमेश गहेरवार हिला ९०.९२ टक्के (५९१ गुण) प्राप्त केले.
बुधवारला दुपारपर्यंत नूतन कन्या विद्यालयाची केतकी पदवाड व जे.एम. पटेल महाविद्यालयाचा राज कटकवार हे दोघे संयुक्तपणे अव्वल असल्याचे वाटत असतानाच सायंकाळी साकोलीची भुमेश्वरी गहाणे या विद्यार्थिनी अव्वल असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर भूमेश्वरीशी संपर्क साधला असता तिने वैद्यकीय शाखेत करीअर करायचे असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
श्रेणीनिहाय निकाल
यावर्षी जिल्ह्यातून १६ हजार १७८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १६ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १४ हजार २८८ विद्यार्थी ऊतीर्ण झाले. विद्यार्थ्यांमध्ये ६ हजार ६६९ मुले तर ७ हजार ६१९ मुलींचा समावेश आहे. यात ५३२ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. ३,९०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९,१८४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शाखानिहाय निकाल
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९५.९६ टक्के, कला शाखेचा निकाल ८१.५० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.७३ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ८९.७१ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे ६,२९१ विद्यार्थी, कला शाखेचे ६,६२९ विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ८९७ तर एमसीव्हीसी शाखेचे ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
लाखनी तालुका अव्वल
भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के लागला असून जिल्ह्यातील सातही तालुक्यातून लाखनी तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात लाखनीची टक्केवारी ९३.०७, भंडारा ८९.५९, पवनी ८८.७२, साकोली ९२.२१, तुमसर ९०.३२, मोहाडी ७९.९१ तर लाखांदूर तालुक्याची टक्केवारी ७९.१९ इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.७३ असून मुलींची टक्केवारी ९०.७८ आहे.
तालुकानिहाय ऊत्तीर्ण विद्यार्थी
१४ हजार २८८ उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,३०२ पैकी ३,८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,२५९ पैकी ९९७ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,०५० पैकी १,९०८ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,०२१ पैकी १,६१५ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून १,९५१ पैकी १,७३१ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,०१६ पैकी १,८५९ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून २,५७३ पैकी २,३२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात सात शाळा १०० टक्के
यंदाच्या १२ वी परीक्षेत जिल्ह्यातील सात शाळांनी निकालाच्या टक्केवारीत शंभरी गाठली आहे. यात भंडारा तालुक्यातून २, लाखनी २ तर मोहाडी, पवनी व तुमसर येथील एका शाळेचा समावेश आहे.