सरपंच अवॉर्डच्या प्रवेशिकांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:15 PM2019-01-09T22:15:38+5:302019-01-09T22:16:23+5:30
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ हा बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली आयुर्वेद प्रायोजित ऐतिहासिक पुरस्कार ‘लोकमत’ने मागील वर्षापासून सुरु केला आहे. गतवर्षी अठरा जिल्ह्यात ही पुरस्कार योजना राबविण्यात आली होती़ त्यात पाच हजारहून अधिक गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला होता़
सरपंचांनी विविध १३ क्षेत्रात केलेल्या कामांची पाहणी करुन या प्रत्येक क्षेत्रात अगोदर जिल्हा व नंतर राज्य स्तरावर आदर्श सरपंचाची निवड करण्यात आली होती. गतवर्षी विजेत्यांच्या गावांसाठी सरकारने विविध योजना जाहीर केल्या होत्या.
पुरस्काराच्या कॅटेगरी आणि निकष
जलव्यवस्थापन, वीजव्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन/लोकसहभाग, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच आॅफ द ईयर या १३ क्षेत्रात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या प्रत्येक क्षेत्रात सरपंचाने केलेले काम पाहून त्या-त्या क्षेत्रातील विजेते निवडले जातील. सरपंचांना ज्या विभागासाठी प्रवेशिका दाखल करावयाची आहे त्या कामांचा तपशील त्यांनी प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी २०१८ या एका वर्षात झालेली कामे विचारात घेतली जातील. १३ विभागांत नेमकी कोणती कामे अपेक्षित आहेत याचा तपशील प्रवेशिकेत नमूद आहे. अधिक माहितीसाठी लोकमत जिल्हा कार्यालय भंडारा (दूरध्वनी : ०७१८४ - २५२६३१) येथे संपर्क साधावा.
पुरस्कारासाठीची प्रक्रिया
‘लोकमत’ कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध करुन दिल्या जातील.
सरपंचांनी या प्रवेशिका भरुन पुन्हा कार्यालयात जमा करावयाच्या आहेत.
प्रवेशिकांची छाननी करुन व प्रत्यक्ष गावांची पाहणी करुन ‘ज्युरी’ मंडळ जिल्हा पातळीवरील पुरस्कारांची घोषणा करेल.
प्रथम जिल्हास्तरावर १३ पुरस्कार दिले जातील. त्यानंतर राज्यस्तरीय सोहळ्यात राज्याचे १३ पुरस्कार प्रदान होतील.
अठरा जिल्ह्यांचा समावेश
अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या अठरा जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येत आहे.