सरपंचाने केली मोहाडीतील नाली सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:20 AM2018-01-06T01:20:25+5:302018-01-06T01:20:37+5:30
येथील टिळक वॉर्डातील नगरसेवकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणच्या नाल्या गाळ व पाण्याने तुंबलेल्या आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. कान्हळगावच्या महिला सरपंच मेघा उटाणे याच प्रभागात राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : येथील टिळक वॉर्डातील नगरसेवकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणच्या नाल्या गाळ व पाण्याने तुंबलेल्या आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. कान्हळगावच्या महिला सरपंच मेघा उटाणे याच प्रभागात राहतात. त्यामुळे तुंबलेल्या नालीची सफाई करण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली.
टिळक वार्ड प्रभाग क्रमांक २ मधील रस्ते, नाल्याकडे नगरसेवक जितू सोनकुसरे यांचे अजिबात लक्ष नाही. ते फक्त आपण राहात असलेल्या ठिकाणीच लक्ष देतात इतरत्र ठिकाणी नागरिकांना कोणता त्रास आहे. वॉर्डाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची ओरड नागरिकांची आहे. त्यांना भेटायला गेले असता ते नेहमी नौकरीवर गेले आहेत, असे उत्तर घरच्यांकडून मिळते. कान्हळगावच्या सरपंच मेघा उटाणे या मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने या प्रभागात राहतात. त्यांच्या घराजवळ असलेल्या नालीची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे नालीत गाळ व पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. मच्छरांचा त्रासही वाढला होता. त्यांनी वारंवार सुचना देवूनही नालीची सफाई करण्यात न आल्याने शेवटी त्यांनाच आपल्या घराजवळील नालीची सफाई करावी लागली. एका सरंपचाला दुसऱ्या गावात नालीसफाई करावी लागते, यापेक्षा दुसरे दुर्दैव्य काय असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. या प्रभागला लागूनच प्रभाग क्रमांक ३ आहे. या प्रभागातही अनेक ठिकाणी हिच परिस्थिती आहे.
निवडणुकीच्या वेळी नगरसेवक मत मागताना मोठे आश्वासन देतात, मात्र त्यानंतर पुढे पाठ, मागे सपाट असाच प्रत्यय नागरिकांना येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.
तक्रारकर्त्यांनी मला काहीच सांगितले नाही. तरीही मी नगरपंचायतच्या मजुरांना नाली सफाई करण्यास सांगितले आहे. मजुर कमी असल्याने थोडा उशीर होतोच. प्रभाग मोठा असून सगळीकडे मजुर पाठवावे लागतात. तिथे लगेच मजुर पाठविण्याची व्यवस्था करतो.
-जितू सोनकुसरे, नगरसेवक मोहाडी.