सरपंचाने केले शासकीय जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:35 AM2021-03-16T04:35:15+5:302021-03-16T04:35:15+5:30
लाखांदूर : झुडपी जंगलाच्या जागेवर भागडी येथील सरपंचांनी अतिक्रमण केले व तेथील तलाठी अतिक्रण नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने, ...
लाखांदूर : झुडपी जंगलाच्या जागेवर भागडी येथील सरपंचांनी अतिक्रमण केले व तेथील तलाठी अतिक्रण नोंद करण्यास टाळाटाळ करीत असल्याने, भागडी येथील ग्रा. पं. सदस्यांनी सदर प्रकरणाचे तक्रार वजा निवेदन तहसीलदार लाखांदूर, वनविभाग लाखांदूर तसेच विद्युत विभाग लाखांदूर यांना दिलेले आहे.
निवेदनानुसार, भागडी गावातील ग्रा.पं. सदस्य गणेश मारोती जीभकाटे, सुरज नंदेश्वर, नितेश लोणारे किरण कुरंजेकर, स्वाती भुरले, देवराम पारधी यांनी केलेल्या तक्रारी नुसार, मौजा भागडी येथील, शासकीय गट, क्र १६३० आराजी ७.६६ हेक्टरआर व १६२८/२ आराजी ३.३२ हे आर झूडपी जंगल व चराई व राखीव वन म्हणून मुकरर आहेत, सदर जागेपैकी १.४० हे आर जागेवर जुलै २०२० मध्ये सरपंच श्री ताराचंद मातेरे यांनी अतिक्रमन करून पडीत जमीन उठीत केली व त्यात पावसाळी फसली मध्ये सोयाबीन व तुरीचे पीक घेतले. तहसीलदारचा कोणताही परवाना न घेता नदीमधून बेकायदेशीर पणे, विद्युत मोटार बसवून व विद्युत विभागाकडून कोणताही रीतसर परवानगी न घेता तारांना आकडा लावून पाणी उपासा करून उन्हाळी धान पीक घेत आहेत.
सदर बाबी महसूल, विद्युत विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करून सरपंचाशी हातमिळवणी करून अधिकारी कर्तव्यात कसूर करीत आहेत. तसेच राखीव वन असल्याने वन कायद्याचे कलम २६ अंतर्गत, फौजदारी गुन्हा होत असल्याने वनविभागाने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शासकीय जमिनीवर अतिक्रमाणाचे नमुना १ई ला नोंद घेण्याची तरतूद असतानाही तलाठी यांनी शासकीय नियमाची पायमल्ली करून सदर अतिक्रमणाची नोंद घेण्यास टाळाटाळ करीत आहे.
त्यामुळे बेकायदेशीर नदीचे पाणी वापर करणे, अवैधपणे आकडा टाकून विद्युत चोरी करणे तसेच तलाठ्यांनी पदाचा दुरुपयोग करणे या सर्व बाबींवर वरिष्ठांनी लक्ष देऊन संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच पदाचा दुरुपयोग केल्याने सरपंच यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधित ग्रा. पं. सदस्यांनी केली आहे.