महसूल आणि रेती तस्करांचे साटेलाेटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:30+5:302021-07-24T04:21:30+5:30
भंडारा जिल्ह्यातील काही रेतीघाट तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यात माेहाडी तालुक्यातील राेहा, पांजरा, तर तुमसर तालुक्यातील माडगी, देवसर्रा, पवनी तालुक्यातील ...
भंडारा जिल्ह्यातील काही रेतीघाट तस्करीसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यात माेहाडी तालुक्यातील राेहा, पांजरा, तर तुमसर तालुक्यातील माडगी, देवसर्रा, पवनी तालुक्यातील यनाेळा, मांगली, गुडेगाव, पवनी वाघझरा यांचा समावेश आहे. यासाेबत जिल्ह्यातील लहान माेठ्या घाटावरुन रेती तस्करी सुरु असते. महसूल विभाग कारवाईचा आव आणतात. परंतु कारवाई झाल्यानंतर पुन्हा तस्करी जाेमाने सुरु हाेते. काेट्यवधीची उलाढाल असलेल्या या व्यवसायात अनेकजण उतरले आहेत. राजकीय आश्रयाने हा व्यवसाय बिनबाेभाटपणे सुरु आहे. अनेकांनी ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी खरेदी केले आहे. रेतीचा माेठ्या प्रमाणात उपसा हाेत असल्याने पर्यावरणाला धाेका निर्माण तर हाेताेच शासनाच्या महसुलालाही चुना लागताे. बिनबाेभाट सुरु असलेल्या या रेती तस्करीबाबत अनेकदा तक्रारी झाल्या परंतु कारवाई हाेत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे महसूल आणि तस्कर यांचे साटेलाेटे हाेते. माेहाडी येथे शुक्रवारी झालेल्या कारवाईने यावर शिक्कामाेर्तब झाले आहे.
बाॅक्स
माेहाडी तालुका रेती तस्करीचे केंद्र
माेहाडी तालुका गत काही वर्षांपासून रेती तस्करीचे केंद्र झाले आहे. राेहासह इतर घाटातून रेतीची तस्करी करुन ती नागपूरसह विदर्भात विकली जाते. यात लाखाे रुपयांची उलाढाल हाेत असते. माेहाडी तहसील कार्यालय रेती तस्करीमुळे नेहमीच वादाच्या भाेवऱ्यात असते. महसूलचे पाठबळ असल्याने रेती तस्करांची माेठी हिंमत वाढली आहे. तीन वर्षांपूर्वी थेट पाेलीस पथकावर हल्ला करुन एका अधिकाऱ्याला गंभीर जखमी केले हाेते. यानंतर काही दिवस तस्करी थांबली. परंतु आता पुन्हा तस्करीने वेग घेतला आहे.
बाॅक्स
लाेकमतने प्रकरणे आणली चव्हाट्यावर
जिल्ह्यातील रेती तस्करीची अनेक प्रकरणे लाेकमतने वारंवार चव्हाट्यावर आणली. वृत्त मालिकेच्या माध्यमातून रेती तस्करी कशी सुरु आहे. याचे सचित्र वृत्तांकन करण्यात आले. या तस्करीमागे कुणाचे हात आहे. याचाही उहापाेह करण्यात आला. मात्र, रेती तस्करांच्या दावणीला बांधलेल्या महसूल विभागाने अपेक्षित कारवाई केली नाही. परिणामी एका प्रथमश्रेणी अधिकाऱ्याला लाचेच्या प्रकरणात अडकावे लागले.