समाधानकारक पावसाने रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2022 10:59 PM2022-10-09T22:59:48+5:302022-10-09T23:00:34+5:30
प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ५२६.८१ दलघमी म्हणजे ७१.१७ टक्के तर बावनथडी प्रकल्पात २५१.८० टक्के दलघमी म्हणजे ९८.८७ टक्के जलसाठा आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांची रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनाची चिंता मिटली आहे. ६३ जलाशय तुडुंब भरले असून, सरासरी ९५ टक्के जलसाठा या प्रकल्पांमध्ये आहे. तर चार मध्यम प्रकल्पांत ९५.५६७ टक्के जलसाठा झाला असून, ४०.९१७ दलघमी साठा आहे.
यावर्षी वरुणराजा शेतकऱ्यांवर प्रसन्न असल्याचे दिसत आहे. सुरुवातीपासून सर्वदूर समाधानकारक पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सिंचन विभागाच्या ९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरणा या मध्यम प्रकल्पात ९५.५६७ टक्के जलसाठा आहे. सध्या या प्रकल्पात ४०.९१७ दलघमी पाणी आहे. त्यात बघेडा प्रकल्पात ४.५३५ दलघमी जलसाठा असून, हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. चांदपूर मध्यम प्रकल्पात सध्या ९४.६२६ टक्के, बेटेकर बोथलीमध्ये ९५.१९९ टक्के आणि सोरणा प्रकल्पात ९७.०३६ टक्के जलसाठा आहे.
प्रकल्पात मुबलक पाणी असल्याने रबी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. गोसेखुर्द प्रकल्पात ७१ टक्के, बावनथडी प्रकल्पात ९७८ टक्के आणि मध्यम व लघु प्रकल्प तुडुंब भरल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पात सध्या ५२६.८१ दलघमी म्हणजे ७१.१७ टक्के तर बावनथडी प्रकल्पात २५१.८० टक्के दलघमी म्हणजे ९८.८७ टक्के जलसाठा आहे.
२८ मामा तलाव झाले तुडुंब
- जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील माजी मालगुजारी अर्थात मामा तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील २८ ही तलावात सध्या १०० टक्के जलसाठा आहे. या सर्व तलावांमध्ये ११६.१९ दलघमी जलसाठा असून, या प्रकल्पांची एकूण क्षमता १२१.७६ दलघमी आहे. त्या तुलनेत या प्रकल्पांमध्ये ९५.४२८ दलघमी जलसाठा आहे.
२१ लघु प्रकल्प १०० टक्के भरले
- सिंचन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ लघु प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर ५ प्रकल्पांत ७५ ते ९९ टक्के आणि ५ प्रकल्पांत ७५ टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत ४९.८७३ दलघमी जलसाठा आहे. एकूण जलसाठा क्षमता ५३.५४३ दलघमी असून, त्या तुलनेत ९३.१४७ टक्के जलसाठा आहे.
भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यात सिंचन प्रकल्पाची स्थिती उत्तम आहे. सध्याही पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वप्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. मुबलक पाणी असल्याने रबी व उन्हाळी हंगामात नियोजनानुसार सिंचनासाठी पाणी सोडले जाईल.
-प्रशांत गोडे, कार्यकारी अभियंता सिंचन विभाग