पाणी निर्माण करणे शक्य नसल्याने त्याचे जतन करा
By admin | Published: March 21, 2016 12:29 AM2016-03-21T00:29:31+5:302016-03-21T00:29:31+5:30
पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. अन्य उत्पादनाप्रमाणे पाणी कारखान्यात निर्माण करता येत नाही.
जलजागृती : अर्चना वैद्य यांचे प्रतिपादन
पवनी : पाणी नैसर्गिक संपत्ती आहे. अन्य उत्पादनाप्रमाणे पाणी कारखान्यात निर्माण करता येत नाही. त्यामुळे त्याचे जतन करावे. तसेच नदी नाल्यांमध्ये टाकावू वस्तू व केरकचरा टाकून पाणी दूषित करण्याचे टाळावे असे प्रतिपादन सभापती अर्चना वैद्य यांनी केले.
जलजागृती सप्ताहाच्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परीषद सभापती निळकंठ टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती अल्का फुंडे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, बंडू ढेंगरे, मनोहर आकरे, मंगला रामटेके, तुळशीदास कोल्हे यावेळी उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रभाकर लेपसे, शाखा अभियंता हेडावू, राजू येरणे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे, उपसभापती अल्का फुंडे, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी पाण्याची जोपासना, वापर व गुणवत्ता तसेच अशुद्ध पाण्यापासून होणारे आजार या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गट विकास अधिकारी बी.वाय. निमसरकार यांनी केले.
कार्यशाळेसाठी ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, वैद्यकीय व शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच जलसुरक्षक उपस्थित होते. संचालन एस.बी. साळवे यांनी तर आभार तेलमासरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)