सव्वालाख विद्यार्थी मुकले क्रीडा स्पर्धांना
By Admin | Published: January 21, 2017 12:26 AM2017-01-21T00:26:19+5:302017-01-21T00:26:19+5:30
‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा मध्यबिंंदू शिक्षण विभागाने साधला आहे.
७८ वर्षांची परंपरा खंडित : स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ बरखास्त, प्रशासनानेही केले स्पर्धांकडे दुर्लक्ष, जिल्हा परिषदचा निधी अखर्चित
प्रशांत देसाई भंडारा
‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमातून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा मध्यबिंंदू शिक्षण विभागाने साधला आहे. शिक्षकही याच्या अंमलबजावणी साठी प्रयत्नरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक भाग असलेल्या क्रीडा स्पर्धा यावर्षी शिक्षण विभागाने घेतलेल्या नाहीत. यामुळे मागील ७८ वर्षांची क्रीडा स्पर्धांची परंपरा मोडीत काढून जिल्ह्यातील १ हजार ३२६ शाळांमधील सव्वा लाख विद्यार्थ्यांची खेळभावना दडपण्याचा संतापजनक प्रयत्न झाला आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक तथा क्रीडा प्रगती व्हावी, यासाठी सर्व जिल्ह्यात क्रीडा स्पर्धा घेतली जाते. यात केंद्र, तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांचा समावेश आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहत असे. या शैक्षणिक सत्रापासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग करण्यात आला. दरवर्षी या स्पर्धा दिवाळीनंतर सुरू होऊन त्या फेब्रुवारीत समाप्त होत होत्या. मात्र, यावर्षी जिल्हा परिषद किंवा क्रीडा विभागाने या स्पर्धा घेण्यात पुढाकार घेतलेला नाही. यामुळे इयत्ता पहिली ते आठवीचे सव्वालाख विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेला मुकले आहेत. यामुळे बुध्दीमत्तेसोबतच त्यांचा शारीरिक विकासही खुंटला आहे.
शाळांचे क्रीडांगण दुर्लक्षित
आज शिक्षण समिती सभा : जिल्ह्यातील विद्यार्थी वंचित
भंडारा : ज्या शाळांच्या क्रीडांगणावर कबड्डी, खो खो, लंगडी, उंचउडी, लांबउडी, धावणे, लेझिम, सांस्कृतीक कार्यक्रमातून विद्यार्थी घडले. अशा मातीत यावर्षी शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियोजनाअभावी खेळाचे प्रशिक्षण व त्यानंतर क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. दरवर्षी दिवाळीनंतर शाळांच्या क्रीडांगणावर दुपारी ४ नंतर खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत होते. त्यामुळे शाळेच्या परिसरात किलबिलाट ऐकायला मिळत होता. तो क्रीडा स्पर्धेदरम्यानचा विद्यार्थ्यांचा आवाज ऐकायला मिळाला नाही. सोबतच सांस्कृतीक स्पर्धांची रेलचेलही थांबली आहे. क्रीडा स्पर्धेचे नियोजन झाले नसल्याने शिक्षकांनीही यावर्षी शालेय क्रीडांगणाकडे दुर्लक्ष केले. (शहर प्रतिनिधी)
त्रिमूर्तिंनी घेतला होता पुढाकार
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक व शारीरीक प्रगती साधण्यासाठी गोपाळराव पनके, गोविंदराव कमाने व विठ्ठलराव क्षिरसागर या शिक्षक त्रिमूर्तिंनी पुढाकार घेतला होता. १९३८ मध्ये त्यांनी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची स्थापना करून यांनी क्रीडा स्पर्धां घेण्यास प्रारंभ केला. यानंतर गोंदिया जिल्ह्यातही याची स्थापना करण्यात आली. मागील ७८ वर्षांपासून जिल्ह्यात स्वदेशी मंडळाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा राबविण्यात येत होत्या.
शिक्षक संघटनांनी स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ बरखास्त करून जिल्हा क्रीडा विभागाच्या माध्यातून स्पर्धा घेण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे मंडळ बरखास्त केले व जबाबदारी क्रीडा विभागाकडे सोपविली. शिक्षण समितीच्या एका सभेत स्पर्धेबाबत चर्चा झाली परंतू अंतिम निर्णय झाला नाही. दरम्यान स्पर्धेची वेळ निघून गेली.
- अभयसिंह परिहार, शिक्षणाधिकारी, (प्राथ.) भंडारा.
क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थी घडतात. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ यावर्षी बरखास्त केल्याने विद्यार्थी क्रीडा स्पर्धेला मुकले. त्यामुळे विद्यार्थी क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात माघारले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. पुढील वर्षी मंडळाच्या माध्यमातूनच स्पर्धा घेण्याबाबत जि.प. सर्वसाधारण सभेत प्रश्न लावून धरू.
- धनेंद्र तुरकर, जिल्हा परिषद सदस्य, भंडारा.
प्रशासनाने क्रीडा स्पर्धा घेण्याबाबत तातडीने पुढाकार घेणे गरजेचे होते. नियोजनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. पुढील वर्षी अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. स्पर्धा न झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये नैराश्य पसरले आहे.
- रमेश सिंगनजुडे, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ, भंडारा.
आंतरराष्ट्रीय खेळाच्या नियमानुसार विद्यार्थी क्रीडा स्पर्धा खेळल्यास भविष्यात त्याला वाव आहे. त्यामुळे क्रीडा विभागाच्या माध्यमातून स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला. मात्र, क्रीडा विभाग व शिक्षण विभागाने याचे योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहिले. अंमलबजावणी केली नसल्याने स्पर्धा झाल्या नाही.
- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक संघ, भंडारा.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय
मंडळाच्या स्पर्धांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असायचा. आता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार जिल्हा क्रीडा विभागाच्या स्पर्धा होणार आहेत. क्रीडा विभागाच्या स्पर्धेसाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना डावलून पाचवी व त्यापुढील विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या स्पर्धांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे क्रीडा सहभागाची संधी यापुढे मिळणार नाही. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन मिळणार नसल्याने थेट पाचवीचा विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत टिकणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
लोकसहभागाची परंपरा थांबली
शालेय बालकांच्या क्रीडा स्पर्धा म्हटलं की, यात ग्रामीण भागात या स्पर्धांमध्ये लोकसहभाग राहायचा. यात ग्रामीण नागरिकांसाठी त्यांच्या गावात खेळाच्या आयोजनाबाबत रस्सीखेच व्हायची. केंद्रस्तरीय स्पर्धा तीन दिवस, तालुकास्तरीय स्पर्धा चार दिवस आणि जिल्हास्तरीय स्पर्धा चार दिवसांची खेळविण्यात येत असे. यात शेवटच्या दिवशी आयोजक गावकरी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पाहूण्यांचे आदरातिथ्य म्हणून सामुहिक भोजन दिल्या जायाचे. क्रीडा स्पर्धांच्या दिवसात गावाला जणू यात्रेचे स्वरूप यायचे. ते आता यापूढे बघायला मिळणार नाही.