निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:27+5:302021-07-24T04:21:27+5:30
भंडारा : कोराेनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने काही निर्बंध लावले आहेत. याला नागरिकांचा ...
भंडारा : कोराेनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने काही निर्बंध लावले आहेत. याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत असला तरीही भंडारा शहरातील काही दुकानदार मात्र दुपारी ४ वाजता दुकान बंद करण्याची टाळाटाळ करत आहेत. यासोबतच भंडारा शहरातील अनेक दुकाने बाहेरून कुलूपबंद दिसत असली तरी पाठीमागील बाजूने मात्र सुरू असतात. दुकानासमोर एखाद्या व्यक्तीला उभे करून ग्राहक येताच ग्राहकाची मागणी पूर्ण केली जाते. याची जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू शकतो. काही किराणा दुकानदारही पाठीमागील दाराने वस्तूंची विक्री करत असल्याचेही भंडारा शहरात दिसून येत आहे.
बॉक्स
बडा बाजार परिसरात मात्र शुकशुकाट...
भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या बडा बाजार परिसरातील मुख्य रस्त्यावरील दुकाने मात्र वेळेत बंद होतात. या मार्गावर पोलिसांची तसेच नगरपरिषदेच्या गाड्या फिरत असल्याने या परिसरात सायंकाळी शुकशुकाट दिसून येतो.
बॉक्स
त्या दुकानांवर लक्ष कोणाचे
भंडारा शहरातील खात रोड, त्रिमूर्ती चौक ते मुस्लीम लायब्ररी चौक, साई मंदिर, मोठा बाजार परिसर अंतर्गत भागातील काही दुकाने व हॉटेलही बिनधास्त सुरू असल्याचे दिसते. वारंवार प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन करण्यात येऊनही काही व्यापारी, दुकानदार याला प्रतिसाद देत नसल्याचे समोर येत आहे.
बॉक्स
राजीव गांधी चौक राजीव गांधी भंडारा शहरातील राजीव गांधी चौक चौकात सायंकाळी काही पाणीपुरी व अन्य किरकोळ विक्रेत्यांची दुकाने कधी कधी ४ नंतरही सुरू राहतात. चार वाजता नंतर दुकाने बंद करण्याचे आदेश असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
बॉक्स
अंतर्गत भागात दुर्लक्ष ...
भंडारा शहरातील गांधी चौक तसेच राजगोपालाचारी वाॅर्ड, तकिया वार्ड परिसरात सायंकाळी सहानंतरही काही छोटी दुकाने सुरू राहत असल्याचे दिसून आले आहे. शासनाच्या नियमाकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स...
किराणा हवा की जेवण...?
भंडारा शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजता नंतर बंद करावी असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही दुकानदार लपूनछपून आपली दुकाने सुरू ठेवतात. ग्राहकांसाठी दुकानाचे शटर बाहेरून बंद असतानाही सेवा पुरवली जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांना तुम्हाला काय हवे किराणा हवा की जेवण, दोन्ही मिळेल. पाठीमागच्या दाराने या असे काही ठिकाणी चित्र दिसून येत आहे. याशिवाय कपड्याच्या दुकानातदेखील दुकाने बंद करून आतमध्ये विक्री केली जात आहे. प्रशासनाने शोध मोहीम राबवण्याची गरज आहे.