‘पेरते व्हा’ म्हणत पावशा पक्ष्याने दिले पावसाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:30 AM2021-06-03T10:30:35+5:302021-06-03T10:34:29+5:30

Bhandara News पावसाचा शुभसंकेत देणारा पावशा पक्षी सध्या जिल्ह्यातील विविध भागांत दिसत आहे. शेतशिवारात आता कामांची लगबग वाढली असून, नांगरणी, पऱ्हे टाकणे, धुरे पेटविण्याच्या कामांना वेग आला आहे.

Saying ‘sow’, the rain bird gave a signal of rain to farmers | ‘पेरते व्हा’ म्हणत पावशा पक्ष्याने दिले पावसाचे संकेत

‘पेरते व्हा’ म्हणत पावशा पक्ष्याने दिले पावसाचे संकेत

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा - ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ अशी पावशा पक्ष्याची शीळ रानावनात घुमायला लागली आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात हिरवं स्वप्न तरळू लागलं. पावसाचा शुभसंकेत देणारा पावशा पक्षी सध्या जिल्ह्यातील विविध भागांत दिसत आहे. शेतशिवारात आता कामांची लगबग वाढली असून, नांगरणी, पऱ्हे टाकणे, धुरे पेटविण्याच्या कामांना वेग आला आहे.

भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हजारोंच्या वर तलावांची संख्या आहे. देशी आणि विदेशी पक्ष्यांचे येथे वास्तव्य आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पेरते व्हा, असा संदेश पावशा पक्षी देतो. सध्या शेतशिवारात या पक्ष्याची साद घुमत आहे. त्यामुळे लवकरच पाऊस कोसळेल अशी आस शेतकऱ्यांना आहे. शेतशिवारात सध्या खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी नांगरणी करीत आहेत. काही शेतात पऱ्हे टाकण्याचे काम करीत आहेत. धुरे पेटवून दिले जात आहेत. शेतीविषयक कामांची लगबग सुरू आहे. पाऊस वेळेवर आला तर आपली पंचाईत नको म्हणून प्रत्येक शेतकरी मशागत करण्यात व्यस्त झाला आहे.

अशातच पावशा पक्ष्याने शुभसंकेत दिले. राखाडी रंगाच्या या पक्ष्यावर सोनेरी रंगछटेचे पट्टे असतात. हा पक्षी स्थानिक स्थलांतर करणारा असून, कोकिळेच्या वर्तनाचा आहे. कोकीळ जसे स्वत:च्या पिलांसाठी घरटे करीत नाही तसे या पक्ष्याचे आहे. मादी पक्षी सातभाई (खिवा) पक्ष्यांच्या घरट्यात आपली अंडी घालतो. असा हा पक्षी आता साकोलीसह जिल्ह्यातील विविध भागांत शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रवृत्त करीत आहे.

पावशा पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘इंडियन प्लँनटिव्ह कुकू’ असून, तो फारसा आकर्षक नाही. मात्र, त्याच्या आवाजात गोडवा आहे. अळ्या, कीटक, फळे हा त्याचा आहार आहे. साकोली परिसरात शेतशिवारातून त्याची हाक ऐकायला येत आहे.

-विनोद भोवते, पक्षी निरीक्षक साकोली

Web Title: Saying ‘sow’, the rain bird gave a signal of rain to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती