म्हणे तोंडाला स्कॉर्फ किंवा रूमाल बांधल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:00 AM2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:01:20+5:30
लाखांदूर येथे बसस्थानक असून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात बससेवा बंद होती. त्यामुळे कुणीही बसस्थानकाकडे फिरकत नव्हते. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तोंडाला मास्क बांधून प्रवास करीत आहे. त्यासाठी बसस्थानकावर जाताच मात्र बसस्थानकाच्या दर्शनी भागात असलेला फलक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.
हेमंत मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी तोंडावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. मास्क न लावणाऱ्यांना दंड लावला जात आहे. प्रत्येक जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी तोंडावर मास्क लावूनच बाहेर निघतात. मात्र लाखांदूरच्या बसस्थानकावर गेल्यास प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. ‘बसस्थानक परिसरात तोंडाला स्कॉर्प किंवा रूमाल बांधून येऊ नये अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल’, असा फलक आहे. कोरोना काळातही परिवहन विभागाने हा फलक कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लाखांदूर येथे बसस्थानक असून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात बससेवा बंद होती. त्यामुळे कुणीही बसस्थानकाकडे फिरकत नव्हते. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तोंडाला मास्क बांधून प्रवास करीत आहे. त्यासाठी बसस्थानकावर जाताच मात्र बसस्थानकाच्या दर्शनी भागात असलेला फलक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तोंडाला मास्क बांधला नाही तर २०० रूपये दंड होणार आणि बसस्थानकावर तोंडाला स्कॉर्फ किंवा रूमाल बांधून अर्थात मास्क लावून गेल्यास पोलीस कारवाई करणार.
नेमके करावे तरी काय, असा प्रश्न प्रवाशांपुढे निर्माण होतो. हा फलक गेल्या कित्येक वर्षांपासून बसस्थानकाच्या दर्शनी भागात आहे. कोरोना संसर्गाच्या काळात हा फलक काढण्याची आवश्यकता होती. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या पवनी आगाराअंतर्गत येणाºया लाखांदूर बसस्थानकावरील या फलकाकडे कुणाचेही अद्यापतरी लक्ष गेले नाही.
आधार व्यवस्थापक म्हणतात हा फलक जुना
लाखांदूर बसस्थानकावर असलेल्या या फलकाबाबत पवनी आगार व्यवस्थापक गुणवंत तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता तो एक वर्ष आधी लावलेला फलक आहे. कोरोना काळात प्रत्येकाने मास्क, रूमाल, स्कॉर्फ बांधने आवश्यक आहे. मी हा फलक तात्काळ काढायला सांगतो, असे त्यांनी सांगितले.
गत काही दिवसांपासून लाखांदूर बसस्थानकावर असलेला फलक तालुक्यात चर्र्चेचा विषय झाला आहे. येथे आलेला प्रत्येक प्रवाशाला हा फलक पाहून हसू आवरतच नाही. एसटी महामंडळाचे कर्मचारीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत मास्क लावूनच आपले कर्तव्य येथे बजावत आहेत. प्रवाशांना गोंधळात टाकणारा हा फलक एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठीही आता विनोदाचा विषय झाला आहे.