अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:29+5:30

जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा ही समिती घेत होती. यावेळी काही विभागप्रमुख बैठकीला गैरहजर दिसून आले. विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात आल्यानंतरही काही विभागप्रमुख या समितीपुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे समिती या प्रकारावर चांगलीच संतप्त झाली. गैरहजर असलेल्या विभागप्रमुखांची नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गैरहजर राहणाऱ्या विभागप्रमुखांवर आता कोणती कारवाई होणार, याची चर्चा शासकीय वर्तुळात आहे.

Scheduled Tribes Welfare Committee admitted in the district | अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात दाखल

अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाली असून, स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतला. समिती दाखल होणार म्हणून प्रशासन सकाळपासूनच सज्ज होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह विश्रामगृहावर वाहनांचा ताफा दिसून येत होता. 
समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा यांच्यासह प्रा.डॉ. अशोक उईके,  श्रीनिवास वनगा, अनिल पाटील, सहषराम कोरोटे, राजेश पडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेश पाटील या आमदारांची समिती गुरुवारी सकाळी जिल्ह्यात दाखल झाली. विश्रामगृहावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा केली. 
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सुसज्ज सभागृहात आढावा बैठकीला प्रारंभ झाला. या समितीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, नगरपंचायत, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. 
या बैठकीला अनुसूचित जमाती कल्याण समितीचे उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, नागपूर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात समिती दाखल होताच सर्व शासकीय कार्यालय अर्लट झाले आहेत. कार्यालय परिसराची स्वच्छता केली जात असून अचानक समिती कार्यालयात आली तर काय म्हणून सर्व दक्षता घेतली जात आहे. 
तीन दिवस ही समिती भंडारा जिलह्यात मुक्कामी राहणार असून शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागांचा दौरा करणार आहे. 
नेमका हा दौरा कुठे राहणार याबाबत कोणतीही माहिती नसल्याने अधिकाऱ्यांनी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत.

विभागप्रमुखांच्या गैरहजेरीवर समिती संतप्त
जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विभागांचा आढावा ही समिती घेत होती. यावेळी काही विभागप्रमुख बैठकीला गैरहजर दिसून आले. विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्यात आल्यानंतरही काही विभागप्रमुख या समितीपुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे समिती या प्रकारावर चांगलीच संतप्त झाली. गैरहजर असलेल्या विभागप्रमुखांची नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गैरहजर राहणाऱ्या विभागप्रमुखांवर आता कोणती कारवाई होणार, याची चर्चा शासकीय वर्तुळात आहे.
विश्रामगृहावर वाहनांचा काफिला
अनुसूचित जमाती कल्याण समिती दाखल होताच येथील शासकीय विश्रामगृहावर मोठी गर्दी झाली. वाहनांचा मोठा काफिला विश्रामगृह परिसरात दिवसभर दिसून येत होता. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळही या निमित्ताने होत होती. पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता. विश्रामगृहात वाहनांची एवढी गर्दी झाली होती की, गाडी कुठे लावावी, असा प्रश्न अनेकांना पडला होता. विश्रामगृहाच्या मागच्या बाजूला मंडप टाकून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आता ही समिती तीन दिवस जिल्ह्यात राहणार असल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी अलर्ट आहेत.

आदिवासी उपाययाेजना क्षेत्राला आज भेट देणार
अनुसूचित जमाती कल्याण समिती शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेट देणार आहे. तालुकानिहाय आदिवासी उपाययोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह आणि आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या कामांना भेटी देणार आहेत, तसेच शासकीय व जिल्हा परिषद यंत्रणेच्या विविध विभागांकडून आदिवासी उपाययोजना क्षेत्रात करण्यात आलेल्या कामांना भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. प्रशासनाने यासाठी जैय्यत तयारी चालविली असून सर्व अधिकारी सतर्कआहेत.

 

Web Title: Scheduled Tribes Welfare Committee admitted in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.