शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:28+5:302021-04-14T04:32:28+5:30

भंडारा : कोराेना महामारीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात ...

Scholarship exams can happen, so why not school? | शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही ?

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही ?

Next

भंडारा : कोराेना महामारीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ पर्यंतवीच्या १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण केले जाणार आहे. एकीकडे शासन शिष्यवृत्तीची परीक्षा घेणार आहे मात्र शाळेची परीक्षा घेणार नाही, हे कसले धोरण याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात ७० हजार ६४५ मुलगे, तर ६५ हजार ७६१ मुली असे एकूण १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थी आहेत. यात इयत्ता १ ते ५ ची विद्यार्थी संख्या ४२ हजार ६९५ असून, इयत्ता ६ ते ८ मध्ये २७ हजार ९५० विद्यार्थी आहेत. याचप्रमाणे इयत्ता १ ते ५वीमध्ये ३९ हजार ५११ विद्यार्थिनी असून, इयत्ता १ ते ८ मध्ये २६ हजार २५० विद्यार्थिनींची संख्या आहे. अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, आता शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार असल्याने मग इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा का घेण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पालक आपल्याच विवंचनेत असल्याचे दृश्य आहे. विद्यार्थी अभ्यास न करता ते पुढच्या वर्गात जात आहेत. यंदा कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सुरू झालेल्या शाळांना बंद करण्यात आले. शाळा सुरू झाल्यावर सर्वच बेजबाबदारपणाने वागू लागल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. परिणामी सुरू झालेल्या शाळा बंद करण्याची वेळ शासनावर आली आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने घेतलेला निर्णय विचार करूनच घेतला आहे.

- आशिष मेश्राम,

मुख्याध्यापक, जि.प.शाळा, मुंढरी खु.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून परीक्षा घेणे शक्य नाही. शिष्यवृती परीक्षेत विद्यार्थी संख्या कमी असेल. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे, असे वाटत नाही. जीवन जगू तरच आपण समोर शिकू.

-बाळासाहेब मुंडे,

शिक्षक, जि.प. शाळा, वरठी

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा उत्तीर्ण केले जाणार आहे. आता १० वी वगळता ११ वी पर्यंतच्या सर्व मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे स्वागतच करावे लागेल.

-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, शास्त्री विद्यालय, भंडारा

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे शासनाने वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही. परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- हेमकृष्ण वाडीभस्मे, पालक, साकोली

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्याय नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी असा पालकांचा आग्रह आहे.

- तुकडूदास दुधबरैय्या, पालक, भंडारा

ही ढकलगाडी काय कामाची

अभ्यास न करता व परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले जाते. ही ढकलपास गाडी काय कामाची, असा प्रश्न सर्वांच्या समोर येतो. एकही धडा न वाचता पुढच्या वर्गात जाण्याची संधी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना खुळे बनविण्यासारखेच आहे. शिक्षणाची प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. पहिल्या वर्गापासूनचे शिक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे पदवीचे शिक्षण आहे.

Web Title: Scholarship exams can happen, so why not school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.