शाळा पडल्या ओस
By admin | Published: October 7, 2016 12:48 AM2016-10-07T00:48:49+5:302016-10-07T00:48:49+5:30
जिल्ह्यातील शिक्षकांच्या सर्व संघटना एकवटल्यामुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या.
४०२ कर्मचारी सामूहिक रजेवर : शिक्षकांच्या समस्या प्रलंबित
पवनी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या सर्व संघटना एकवटल्यामुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद होत्या. तालुक्यातील शिखक केंद्र प्रमुखासह ४०२ कर्मचारी सामुहिक रजेवर होते. त्यामुळे प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थी शाळेत येवून माघारी परतले. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने प्राथमिक शाळा कुलूप बंद असल्याने प्रशासन पर्यायी व्यवस्था करू शकले नाही.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक असा एकूण १३० शाळा आहेत. सर्व शाळा ग्रामीण भागातील असल्याने विद्यार्थ्यांना शाळा बंद राहील याची माहिती नव्हती. त्यामुळे विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचले. परंतु कुलूप बंद शाळा पाहून आमचे गुरूजी कधी येणार अशी आजुबाजुच्या लोकांना विचारपूस करू लागले. गुरूजी येणारच नाही, अशी माहिती मिळाल्यानंतर सर्व विद्यार्थी माघारी परतले. शिक्षकांच्या शाळा बंद आंदोलनामुळे एक दिवसाचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)