शाळा जमीनदोस्त; विद्यार्थी बसतात नभाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:47+5:30

शाळेची इमारत जीर्ण होऊन कधीचीच पडली. उरली फक्त एक खोली. या खोलीतही शैक्षणिक व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. आता या विद्यार्थ्यांना उघड्यावरच नभाखाली बसविण्यात आले. आडोशाला टेकून फळा ठेवण्यात आला. मोठी दरी पसरवून त्यावर विद्यार्थी बसले. इयत्ता पाचवी ते सातवीचे एकूण ७० विद्यार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर बसणार काय?.

School landlord; Students sit under the navel | शाळा जमीनदोस्त; विद्यार्थी बसतात नभाखाली

शाळा जमीनदोस्त; विद्यार्थी बसतात नभाखाली

googlenewsNext

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी’ ही उक्ती मनी - ध्यानी घेऊन सोमवारी विद्यार्थी शाळेत पोहोचले. मात्र, शाळाच जमीनदोस्त झाल्याने नभाखाली या  विद्यार्थ्यांची शाळा भरली. तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील हे वास्तव शिक्षण क्षेत्रातील बोलकी अवस्था सांगायला पुरेसे आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी नागवला जात आहे काय? असेच वाटते.
तुमसर तालुक्यातील रेंगेपार हे १,४०० लोकवस्तीचे गाव. या गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवीचे एकूण १०५ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येथे येतात. गत दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या. सोमवारपासून ग्रामीण क्षेत्रातील पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या. रेंगेपार येथील विद्यार्थीही सोमवारी शाळेची घंटा वाजताच पोहोचले. मात्र, येथे बसायला वर्गखोलीच नव्हती. शाळेची इमारत जीर्ण होऊन कधीचीच पडली. उरली फक्त एक खोली. या खोलीतही शैक्षणिक व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. आता या विद्यार्थ्यांना उघड्यावरच नभाखाली बसविण्यात आले. आडोशाला टेकून फळा ठेवण्यात आला. मोठी दरी पसरवून त्यावर विद्यार्थी बसले. इयत्ता पाचवी ते सातवीचे एकूण ७० विद्यार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर बसणार काय?.  ऊन, वारा, पाऊस याची त्यांना तमा नाही काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. 
वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी निधीच उपलब्ध झालेला नाही. परिणामी रेंगेपार विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी बाहेर आपल्या मित्रमंडळींसह ज्ञानार्जनासाठी बसले.
रेंगेपार येथील शाळा परिसरात आता फक्त एक खोली आहे. याच खोलीत अन्नधान्य, टेबल खुर्च्या व अन्य शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे. याच खोलीत आहार शिजविला जातो. शासनाकडून मिळालेली पुस्तकेही येथेच ठेवण्यात आलेली आहेत. एकाच खोलीवर संपूर्ण भार सध्या येथे दिसून येत आहे.या शाळेत एकूण पाच शिक्षकांची पदे आहेत. यात एक मुख्याध्यापक तर चार सहायक शिक्षक आहेत. यापैकी दोन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना, अशी शक्यता बळावली आहे.

प्रशासकीय मान्यता पण वर्कऑर्डर नाही 
दोन वर्षांपूर्वी रेंगेपार येथे दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता. यावर १५ लाख रुपये खर्चून दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली  आहे. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने वर्क ऑर्डर निघाली नाही. परिणामी वर्गखोल्यांचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर वैनगंगा नदीचे पात्र आहे. अरुंद रस्ता आहे. रस्ताच या शाळेची सीमारेषा आहे. शाळेची इमारत नसल्याने सुरक्षा भिंत शाळेला कशी असणार? त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
ग्रामीण स्तरावर इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थी बाहेर बसतात. वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे तरी कुठे? याशिवाय कोरोना संसर्ग काळात सोशल डिस्टन्सिंगचे व नियमांचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.  किंबहुना इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग अजूनही सुरू झाले नाही. ते जर सुरू झाले, तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याशिवाय राहणार नाही.

वर्गखोली बांधकामाबाबत जिल्हा स्तरावरून निधी मंजूर करण्यात येतो. शाळेची वैयक्तिक पाहणी केली असून, या संदर्भात आमचा पाठपुरावा सुरू आहे.
 -विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी, तुमसर.
दोन वर्षांपूर्वी पाठविलेल्या प्रस्तावावर सरतेशेवटी प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, निधीचा थांगपत्ता नसल्याने वर्कऑर्डर मिळू शकले नाही. परिणामी, शाळेचा टोला वाजला, तरी आमचे विद्यार्थी खुल्या नभाखाली बसले आहेत. यापेक्षा मोठी शोकांतिका काय म्हणावी. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम व प्रसाधनगृह व अन्य खोली बांधून द्यावी, अशी मागणी आहे.
-कलाम शेख, माजी सभापती, पंचायत समिती, तुमसर 
 

 

Web Title: School landlord; Students sit under the navel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.